Spread the love

28 वर्षीय राहुलच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मुंबा रेल्वे दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाल्याची माहिती आहे. दोन लोकल ट्रेन घोकादायक वळणावर एकत्र आल्यानंतर लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या बॅगा घासल्यानंतर ट्रेनमधून काही प्रवासी रेल्व ट्रॅकवर पडले. या दुर्घटनेत रेल्वे ट्रॅकवर 13 प्रवासी पडले होते. त्यापैकी, 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबा रेल्वे दुर्घटनेनं पुन्हा एकदा मुंबई लोकल आणि मुंबईच्या गर्दीचा विषय गंभीरतेनं शासनापुढे आला आहे. सर्वसामान्य चाकरमान्यांना जीव मुठीत धरुन रोज जगावं लागत आहे, रोज मरावं लागत आहे हेच आजच्या दुर्घटनेतून दिसून आलं. मृत्युमुखी पडेल्या 4 जणांमध्ये गरी कुटुंबातील एकुलता एक कमावणारा राहुल होता. आपल्या लहान बहिणीच्या लग्नासाठी पै पै साठवणाऱ्या भावाने आजच्या दुर्घटनेत जीव सोडला. त्यामुळे, 28 वर्षीय राहुलचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे. आता, बहिणीच्या लग्नाचा आणि घर चालवण्याचा मोठा प्रश्न गुप्ता कुटुबीयांसमोर आहे.

राहुलच्या मृत्युची बातमी समजल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या मित्र मुकेश चौबेसह इतर मित्रांना अश्रू अनावर झाले होते. राहुल गुप्ता हा 28 वर्षीय तरुण दररोज मुंबा येथून लोकलने प्रवास करायचा. मुंबा ते मुंबई प्रवास करुन तो एका स्टेशनरी दुकानात कामाला जायचा. सकाळी मुंबईत कामावर जात असताना त्याचा सकाळी मुंबा येथे अपघातात मृत्यू झाला. राहुल हा मुंबईतील एका स्टेशनरी दुकानात तो काम करायचा. दिवा आणि मुंबाच्या ट्रॅकवर झालेल्या आजच्या अपघातात राहुलचा मृत्य झाला. त्याच्या घरी आई-वडील दोन लहान बहीण आणि एक लहान भाऊ असा त्याचा परिवार आहे. विशेष म्हणजे राहुलच्या लहान बहिणीचे लग्न करायचे आहे, घरी कमावणारा तो एकटाच मोठा मुलगा होता. त्यामुळे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून राहुलच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी राहुलच्या मित्रांकडून करण्यात आली आहे.

रेल्वे पोलिसाचा मृत्यू

विकी मुख्यदल हे 2024 पासून ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यापूर्वी कल्याण पोलिस ठाण्याला कार्यरत होता, कल्याणचा राहणारा होता. नाईट ड्युडी संपवून घरी जात असताना ही घटना घडली. ठाण्याहून सकाळच्या ट्रेनने कल्याणच्या दिशेने निघाला होता, जेव्हा ट्रेन क्रॉस होत होत्या तेव्हा तो ट्रेनमधून खाली पडला. आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही तातडीने आता कळवा रुग्णालयात आलो, अशी माहिती विकी यांची मावशी प्रमिला जाधव यांनी दिली. आधी त्याची पोस्टिंग डोंबिवलीला होती, त्यानंतर तो मागील अनेक वर्षांपासून ठाण्याला काम करत होता. त्याच्या घरी बायको आणि मुलगी असे तिघेजण ते कल्याणला राहतात. आम्हाला सुरुवातीला नेमकं काहीच माहित नव्हते, नंतर विकीचा मृत्यू झाल्याचे समजले असे विकीचे मामा राहुल म्हस्के यांनी म्हटले.

साकीनाक्याचा शिवा गवळी गंभीर जखमी

आम्हाला थोड्या वेळापूर्वी कळलं की तो रेल्वेतून पडला, तो रोज साकीनाक्याला प्रवास करतो. साकीनाक्याला प्रवास करत असताना आज तो ट्रेनमधून पडला, त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जखमी शिवा गवळीच्या नातेवाईकांनी दिली.

पिक अवरमध्ये मोठी गर्दी

ठाणे आणि त्या पुढील स्थानकांसाठी रेल्वेकडून ठोस उपाययोजना नाहीत. दररोज याच गर्दीतून नागरिक नोकरीसाठी ये-जा करतात. लोकलमध्ये चढायलाही जागा नसते, कल्याण दिवाहून येणाऱ्या लोकल आधीच फुल्ल येतात, तर सीएसएमटीहून पिक अवरमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रेल्वेचे वेळापत्रक इतकं विचित्र आहे की गाड्या अचानक दुसऱ्या ट्रॅकवर वळवल्या जातात, प्रवाशांना कल्पनाही देत नाहीत. त्यामुळे, सातत्याने अनेक तक्रारी प्रवाशांकडून मध्य रेल्वेबाबत केल्या जात आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून तक्रारींची कुठलीही दखल घेतली जात नाही.

प्रत्यक्षदर्शी प्रवासाने सांगितली आपबिती

मी या ठिकाणी पत्नीला सोडायला आलो होतो. मी स्थानकाहून बाहेर पडणार तोच स्थानक परिसरत लोकांनी किंचाळण्याचा आवाज आला. पुढे पाहिलं तर दोन लोकल दिसल्या, या लोकल पुढे जाताच काही महिला व पुरूष लोकलच्या पटरीवर पाहिले. वेळीच स्थानिक प्रवाशी मदतीसाठी धावले, मिळेल त्या गाडीने उपचारासाठी त्यांना नेलं जात होतं, तर मृतांना वेगळं करुन रुग्णवाहिकेतू नेण्यात आलं. मुंबाचा हा टर्न इतका भयानक आहे की, दर 15 दिवसांनी या ठिकाणी एकादा अपघात घडतोच, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी शिवा सुरवई यांनी दिली.

वर्षभरापासून जीएमने भेटीची वेळ दिली नाही

मुंबा लोकल ट्रेन दुर्घटनेसंदर्भात प्रवासी संघटनांकडून मध्य रेल्वेवर तीव नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. प्रवासी संघटनांना गेल्या वर्षभरापासून भेटीची वेळ दिली गेली नसल्याचेही त्यांनी म्हटलं. रेल्वेकडून रेल्वे आणि ट्रॅकवर खर्च न करता अमृत योजनेअंतर्गत स्थानकांवर अधिक खर्च केला जात असल्याचा आरोप प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी नंदकुमार देशमुख यांनी केला आहे. मध्य रेल्वेच्या जीएमकडून मिटिंगची वेळ मागणार, वेळ न दिल्यास आंदोलन करणार असल्याचा इशाराही संघटनेनं दिला आहे.

लोकल अपघात- मृतांची नावे

राहुल संतोष गुप्ता (28 ) रा. दिवा,

सरोज केतन (23 ) रा. उल्हासनगर

मयूर शाह (50 )

मच्छीद्र मधुकर गोतरणे, वय-31 (पोलीस कॉन्स्टेबल)