Spread the love

तारदाळ / महान कार्य वृतत्सेवा

हातकणंगले तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायतीची तहकूब गावसभा सोमवारी सकाळी आयोजीत करण्यात आली होती. यावेळी तारदाळ-खोतवाडी जलजीवन मिशन योजने च्या विषयावर खडाजंगी चर्चा पहावयास मिळाली.

सोमवारी सकाळी सरपंच सौ.पल्लवी पोवार यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत अधिक  अधिकारी कुमार वंजीरे यांनी सभेपुढे सर्व विषयाचे वाचन केले.

यावेळी गायरान मधील ओपन स्पेस ग्रामपंचायतीने ताब्यात घेणे, अतिक्रमण काढणे व गायरान मधील चारही बाजूचे रस्ते रिकामे करणे ,स्मार्ट मीटर ला विरोध करून जुने मीटरच बसवणे ,बस स्टॅन्ड वरील अतिक्रमण काढणे ,दिव्यांग बांधवांना 50 टक्के घरफाळा करात सूट देणे यासह अनेक विषयावर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले.

यानंतर जलजीवन योजनेच्या रखडलेल्या कामाच्या विषयावरून  यासिन मुजावर, यशवंत वाणी , सुर्यकांत जाधव , सुशांत शिंदे , किसन शिंदे , यांनी अनेक प्रश्नांचा भडीमार करीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. सदर जलजीवन योजनेच्या कामामध्ये अनेक त्रुटी निर्माण झाल्या असताना देखील राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून सत्ताधारी सदरची योजना मनमानी पद्धतीने करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावेळी  सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी पहावयास मिळाली.

जल जीवन योजने संदर्भात यापूर्वी देखील  अनेक ग्रामसभेमध्ये अनेक वादळी चर्चा झालेल्या आहेत तरीदेखील जल जीवन मिशन योजनेच्या कामाकडे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याचे आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केले.

या अनुषंगाने दिनांक 16 जून रोजी तारदाळ खोतवाडी जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत विशेष गाव सभेचे आयोजन करण्यात आले , या गावसभेत संबंधित योजनेचे अधिकारी व मक्तेदार यांच्या समवेत योजने संदर्भात खुली चर्चा होणार असून, याकडे दोन्ही गावच्या ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. सदरच्या चर्चेत काय निष्पन्न होणार हे मात्र बघणे गरजेचे आहे.

यावेळी उपसरपंच मृत्युंजय पाटील, विनोद कोराणे, सचिन पोवार, सौ.लक्ष्मी चौगुले, प्रवीण पाटील, चंद्रकांत तांबवे, नयन कांबळे, सुरज कोळी, नितिन खोचरे, रणजीत पोवार, वसंत चौगुले, रमेश नर्मदे, जीवन माने, भाऊसो चौगुले, सचिन चौगुले, गजानन पाटील, विजय चौगुले, शिवकुमार विभुते यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.