पालिका प्रशासनाने पाच महिन्यात दहा हजार दंड वसूल केला
जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
जयसिंगपूर शहरांमध्ये अनेक व्यापारी दुकानांमध्ये सिंगल युज प्लॅस्टिक सर्रास वापरला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासनाने महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदी केले असली तरीही पालिका प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने शहराला प्लास्टिकच्या विळखा बसला आहे. यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात गटारी व नाले तुंबण्याचे प्रकार होणार असल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात सखल भागात पसरणार आहे.
शहरामध्ये विशेषता व्यापारी दुकाने, मटन व मच्छी मार्केट, या ठिकाणी सिंगल युज प्लास्टिकचा वापर सर्रास होताना दिसत आहे. 2025 मध्ये, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. 1 जुलै 2025 पासून लागू होईल. या बदलांमुळे, प्लास्टिक उत्पादक, आयातदार आणि ब्रँड मालक माहिती देण्यास सक्षम होतील, ज्यामुळे प्लास्टिक कचरा व्यवस्थापनात सुधारणा होईल.
प्लास्टिकच्या उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी असेल. यामध्ये प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. झेंडा, फुगे, आईसक्रीम आणि कँडीसाठी वापरत असलेल्या प्लास्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकॉल यांचे उत्पान करण्यात बंदी आहे. तसेच प्लेट्स, कप, ग्लासेस, स्वीट बॉक्स, इन्विटेशन कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेटवरील प्लास्टिकचे रॅप अशा वस्तूंची निर्मिती करण्यासही बंदी आहे.
एकंदरीत पालिका प्रशासनाने शहरात ज्या ठिकाणी सिंगल युज प्लास्टिक वापरण्यात येत आहे अशा ठिकाणी दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असून गेल्या पाच महिन्यापासून पालिका प्रशासनाने नाममात्र दहा हजार रुपये दंड या कारवाईतून केले आहे यामुळे शहरातील प्लास्टिक बंदी कागदावरच असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
