इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
पारंपरिक बेंदूर सणाची तयारी सध्या जोरात सुरू असून, या सणासाठी विशेष आकर्षण असलेल्या मातीच्या बैलांची निर्मिती कुंभारवाड्यात जोरात सुरू आहे. ग्रामीण संस्कृतीतील अविभाज्य भाग असलेल्या बेंदूर सणानिमित्त घरोघरी बैलाची पूजा केली जाते. यासाठी विविध आकारांचे मातीचे बैल मोठ्या संख्येने तयार केले जात आहेत.
कुंभार समाजातील बांधव पंधरा दिवसांपासून या कामात गुंतले आहेत. मातीचे बैल तयार करणे त्यांना रंगवणे व सजवणे अशी कामे सुरू आहेत. मागणीनुसार आकर्षक रंगसंगती आणि सजावटीचे विविध नमुने वापरले जात आहेत. या बैलांची विक्री इचलकरंजीसह आसपासच्या ग्रामीण भागात होत असून, पारंपरिकतेचे जतन करणारे कुंभार आपली कला जपण्यासाठी आजही तितक्याच श्रद्धेने काम करत आहेत.
