माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांची माहिती
इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल योजनेचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे नगरविकास उपसचिव जवळीकर यांच्याकडे आ. डॉ.राहुल आवाडेयांच्या माध्यमातून नगरविकास खात्यात सादर केला आहे. अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी दिली.
महापालिका सफाई कामगार म्हणून २५ वर्षे काम बजावलेल्या लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर देण्याची शासनाची ही योजना आहे. लवकरच याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला प्रारंभ होणार आहे. असे रवी रजपुते यांनी सांगितले.
ते म्हणाले, महापालिकेत २५ वर्ष सफाई कामगार म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यास स्वतःच्या हक्काचे घर देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल योजना राबवली जाते. त्यासाठी तेथे ही योजना राबवली जावी. यासाठी मी स्वतः सर्व ताकदीनिशी प्रयत्न करीत आहे. याबाबत इचलकरंजी महापालिकेने सांगलीच्या पिनाका कन्सल्टन्सी कंपनीस या योजनेच्या प्रकल्प आराखड्याचे काम दिले होते. त्यांनी आराखडा दिला आहे. त्यानुसार भाग्यरेखा चित्रमंदिर जवळ कामगार चाळ येथे 3 मजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात २४० लाभार्थ्यांना स्वतःची घरे दिली जाणार आहेत. त्यासाठी ७४ कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. याबाबत लागणारी माहिती आणि पाठपुरावा आमदार डॉ.राहुल आवाडे व मी केला आहे.
शहरातल्या महापालिका कामगार संघटनानीही याच पद्धतीने पाठपुरावा केला. आमदार डॉ.राहुल आवाडे यांनी याबाबत सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यांच्यासह आयुक्त पल्लवी पाटील आणि अन्य संबंधित खात्याच्या अधिकारी त्यांच्या संयुक्त बैठका या प्रकल्पाबाबत झाली आहे. शासनाकडे सादर प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे. महापालिकेस जी. एस. टी. परताव्याचा पहिल्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार आहे. त्यातून या प्रकल्पाचे काम तात्काळ सुरू केले जावे, यासाठी महापालिका आणि शासनाकडे आपण पाठपुरावा करणार आहोत. या योजनेचा लाभार्थ्यांना मिळावा आणि त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी मी प्रयत्न करीत आहे, असेही रजपूते सांगितले.
