बहुतांशींचे समर्थन तर मोजक्याचा विरोध : पंचक्रोशीतील नागरिकांची सुनावणीस मोठी उपस्थिती
शाहुवाडी / महान कार्य वृत्तसेवा (विकास कांबळे)
घुंगुर (ता. शाहुवाडी पैकी सावरेवाडी) येथे श्री जुगाई मिनरल्स कंपनीच्या पर्यावरण विषयक जाहीर लोक सुनावणी शुक्रवारी ११ ते ३ यावेळेत पार पडली. यामध्ये सुनावणीमध्ये ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील जनसामान्य पासून विविध संघटना, सहकारी संस्था , विविध पक्ष यांनी या प्रकल्पास उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवला तर काही प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास नको या दृष्टिकोनातून थोडासा विरोध पाहायला मिळाला.
घुंगुर पैकी सावरेवाडी (ता.शाहूवाडी) येथे एकूण प्रकल्प क्षेत्र १३.८६ हेक्टर मध्ये प्रस्तावित नवीन सुरू होणाऱ्या बॉक्साइट खान उत्खनना बाबत आज पर्यावरण विषयक जाहीर लोक सुनावणी पार पडली. कोल्हापूर अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, प्रांत अधिकारी समीर शिंगटे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, उप प्रादेशिक अधिकारी व्ही.व्ही.किल्लेदार, शाहूवाडी पन्हाळा उपाधीक्षक आप्पासो पवार व शाहुवाडी पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलिस उप निरिक्षक अमित पाटील, प्रकाश कांबळे, बाबा किटे उपस्थित होते.
यावेळी श्री जुगाई मिनरल्सचे संचालक युवराज पाटील म्हणाले, शाहुवाडी तालुक्याच्या दृष्टिकोनातून या पंचक्रोशीसाठी हा प्रकल्प युवकांच्यासाठी व रोजगारासाठी एक नवीन औद्योगिक पर्व वरदान ठरणार असून, पंचक्रोशीतील नागरिकांनी उद्याचे भवितव्य ओळखून या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवलेला आहे. शासनाच्या अटीला अधीन राहून पर्यावरणाचा समतोल राखून जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तरी या प्रकल्पास मंजुरी मिळावी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प आम्ही सर्व अटींचे पालन करून हा प्रकल्प केल्याशिवाय थांबणार नाही.
यावेळी बोलताना जनसुराज्य पक्षाचे युवा अध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले नव्या औद्योगिक परवाची सुरुवात होत आहे. हे तालुक्याच्या दृष्टिकोनातून भाग्याचे असून सदरचा प्रकल्प होणारच.
यावेळी घुंगुर सरपंच शुभांगी कांबळे, माजी सरपंच बाजीराव सावरे, शिवाजी केसरकर ;माजी सभापती पंडितराव नलवडे, जनसुराज्य युवा अध्यक्ष ए. वाय. पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे , माजी नगरसेवक सुहास पाटील ,माजी उपसभापती महादेवराव पाटील, संदीप कांबळे गोगवेकर, संदीप पाटील सुपात्रेकर, भाजप सरचिटणीस संजय खोत, श्रीकांत खोत, कल्पना पाटील. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तानाजी रवंदे, मानसिंग सावरे, जीवन सावरे, सरदार कांबळे आदीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी या लोक जन सुनावणी मध्ये आपला सहभाग नोंदवला. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात होता.

