Spread the love

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (सुभाष भस्मे)

अलिकडच्या काळात अल्पवयीन तरुणांमध्ये गुन्हेगारी आणि व्यसनाधीनतेचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. शिक्षण, कुटुंबप्रणाली आणि समाजातील बदलती जीवनशैली यामुळे तरुण पिढी भावनिक आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर होत आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतीव वापरामुळे चुकीच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता वाढली आहे. अनेकवेळा कुटुंबातील दुर्लक्ष, मैत्रीचा चुकीचा प्रभाव, बेरोजगारी आणि गरिबी यामुळे हे तरुण चोरी, मारामारी, ड्रग्स सेवन, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकत आहेत.

व्यसनाधीनता हा त्यांच्यातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुख्य कारणांपैकी एक आहे. सिगारेट, दारू, गुटखा, ड्रग्स यांची सहज उपलब्धता तरुणांना चुकीच्या मार्गावर नेत आहे. यामुळे केवळ त्यांचे वैयक्तिक आयुष्यच नाही तर कुटुंब आणि समाजाचेही नुकसान होते. ही स्थिती सामाजिक आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.शासन,प्रशासन, शाळा, पालक आणि समाज यांनी एकत्र येऊन मार्गदर्शन, समुपदेशन आणि कठोर कायदे यांच्या मदतीने ही समस्या नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.

गुन्हेगारीची क्रेझ…

इचलकरंजी शहराबरोबरच ग्रामीण भागातील तरुणांई गुन्हेगारीच्या आणि व्यसनाधीनता या विळख्यात ओढली जात आहे विशेषतः गणेश नगर, दत्त नगर, जवाहर नगर यासह अन्य वाढीव वस्त्यांमध्ये असणाऱ्या तरुणाईत गुन्हेगारीची क्रेझ निर्माण होत आहे. याला पायबंध घालण्यासाठी सामाजिक प्रयत्नांची निश्चितपणे गरज आहे.