आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर या कामी लक्ष घातल्यास तोडगा निघण्याची शक्यता
जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
जयसिंगपूर शहर सांगली कोल्हापूर महामार्गावर वसलेले शहर असल्यामुळे सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी व कर्नाटकातून येणारी अवजड वाहतूक याच मार्गावरून वळवली जात आहे. यातच सांगली कोल्हापूर महामार्गावरील अंकली टोल नाक्याजवळ ओढ्यावरील पुलाचे काम सुरू आहे. यामुळे अवजड वाहतूक जयसिंगपूरातून सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने याचा त्रास शहरातील नागरिकांना व वाहनधारकांना होत आहे. वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर व पोलिस प्रशासन तसेच पालिका प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे.
जयसिंगपूर शहरातील मुख्य मार्गावरूनच सांगली कोल्हापूर महामार्ग जात असल्याने तसेच या मार्गावर बसस्थानक असल्याने नेहमी वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. पोलीस प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्यामुळे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याबाबत पोलिसांकडून नेहमी अपयश येत असते. झेले चित्रमंदिर ते जनतारा हायस्कूल पर्यंत मुख्य रस्त्यावर फेरीवाले, व्यापारी दुकानदार यांनी रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत. यामुळे रस्त्यावर नेहमी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. पालिका प्रशासनाने या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
सध्या अंकली टोल नाक्याजवळ सांगली, कोल्हापूर बायपास रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यावर पुलाचे काम सुरू आहे. यामुळे या मार्गावरून येणारी जाणारी सर्व अवजड वाहतूक शहरांमधून सुरू असल्याने वाहतूक कोंडीमध्ये अधिक भर पडत आहे. ही अवजड वाहतूक पोलीस प्रशासनाने उदगाव, केपीटी, चौंडेश्वरी सूतगिरणी मार्गे वळवणे गरजेचे असतानाही जयसिंगपूर पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
उदगाव व चौंडीश्वरी सूतगिरणी या ठिकाणी वाहतूक नियंत्रक पोलीस पोलीसाची नियुक्ती करून अवजड वाहतूक या मार्गे वळवल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. एकंदरीत वाहतूक कोंडीबाबत आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर याबाबत जयसिंगपूर पोलीस व पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे.

