Spread the love

शिर्डी / महान कार्य वृत्तसेवा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मुळे राज्य अडचणीत आल्याचं वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं. यावर आता राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची थोडी ओढाताण नक्कीच होत आहे. मात्र, योजनेत आम्ही कधीही कोणताही बदल करणार नाही, असं मंत्री देसाईंनी स्पष्ट सांगितलं.

”लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात आलं आहे, हे नाकारता येत नाही. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारासह सर्वच बाबतीत झालेला आहे. ही तुट जुलै-ऑगस्टपर्यंत भरून निघेल. एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाहीत”, असं शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी वक्तव्य केलं होतं. यावर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘लाडकी बहीण योजना बंद’ होणार नाही- मंत्री शंभूराज देसाई म्हणाले,” ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारनं लागू केली आहे. ही योजना लागू करताना आढावा घेतला होता. वर्षाला 40 ते 45 हजार कोटी रुपये या योजनेसाठी लागणार आहेत. त्याचं नियोजन करण्यात आलं होतं. या योजनेमुळे सरकारची थोडी ओढाताण नक्कीच होत आहे. मात्र, या योजनेत आम्ही कधीही कोणताही बदल करणार नाही’,” असं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

कोणत्याही सरकारी योजनेचा दुहेरी लाभ मिळणार नाही- शंभूराज देसाई अहिल्यानगर दौऱ्यावर असताना त्यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. देसाई पुढे म्हणाले,” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करताना जीआरमध्ये नमूद करण्यात आलं होतं, की महिलांना दुहेरी लाभ घेता येणार नाही. पहिल्यापासूनच जीआरमध्ये हे नमूद केलं आहे. या योजनेचा आणि दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा एकत्र लाभ घेता येणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. जर कोणी दुहेरी लाभ घेत असेल तर ते योग्य नाही.”

मंदीर परिसरात दारू आणि मांसाहार बंदी- उत्तर प्रदेश सरकारनं अयोध्या राम मंदिरापासून 14 किलोमीटर परिसरात दारू आणि मांसाहारावर बंदी लागू केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील सरकार काय निर्णय घेईल? याविषयी विचारले असता राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ”तेथील स्थानिक शासनानं नेमका कसा निर्णय घेतला आहे? याची संपूर्ण माहिती घेऊन उपमुख्यमंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री असलेले अजित पवार याबाबत योग्य तो निर्णय घेतील.”

पृथ्वीराज चव्हाणांना प्रत्युत्तर- विधानसभेच्या निवडणुकीत एका मतदारानं 5 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केल्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला. त्यावर मंत्री देसाई म्हणाले, ” असं कुठं घडलंय? याचे पुरावे पृथ्वीराज चव्हाण यांनी द्यावेत. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. जर त्यांना असं कुठं आढळलं, असेल तर त्यांनी त्याचे पुरावे राज्य निवडणूक आयोगाकडे द्यावेत. निवडणूक आयोग त्यांच्या नियमाप्रमाणे कारवाई करेल.”