शिर्डी (अहिल्यानगर) / महान कार्य वृत्तसेवा
शिर्डीमध्ये अलीकडेच काही चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात साई संस्थानच्या दानपेटीतून कर्मचाऱ्यानेच लाखो रुपयांची चोरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. तसेच, धूम स्टाईल चोरट्यांनी महिला साईभक्तांच्या सोन्याचे दागिने ओरबाडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. शिर्डीत आता केवळ दीडशे रुपयाच्या चोरी प्रकरणात हकनाक एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
दीडशे रुपये चोरले : मनमाड महामार्ग लागत असलेल्या खंडोबा कॉम्पेक्सजवळ आज पहाटेच्या सुमारास व्यक्ती झोपला होता. तेव्हा दोन अज्ञात व्यक्तींनी त्याचे दीडशे रुपये चोरले. चोरलेले पैसे घेऊन आरोपी जात असताना मृत्यू अज्ञात व्यक्तीनं याला विरोध केला. यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची आणि झटापट झाली. यादरम्यान एकानं रागाच्या भरात त्या व्यक्तीच्या कानशिलात मारली. त्यामुळं तो जमीनीवर कोसळला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळं शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात इछड कलम 105 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे सिन्नर, हिंगोली आणि कोल्हार (जि. अहिल्यानगर ) या तीन ठिकाणचे आहेत. त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध शिर्डी पोलिसांनकडून सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच मृत्यू व्यक्ती याचीही ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अधिक तपास करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वी समोर आला होता धक्कादायक प्रकार : शिर्डी साईबाबांच्या चरणी भाविक मोठ्या श्रद्धेनं दान करतात. या दानाची मोजदाद साई बाबा संस्थानच्या वतीनं आठवड्यातून शुक्रवार आणि मंगळवार या दिवशी केली जाते. साईबाबा संस्थानच्या लेखा विभागात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेला शिपाई बाळासाहेब नारायण गोंदकर हा मोजणी करताना पैसे लपवायचा. यानंतर तो पैसे चोरुन न्यायचा. हा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता.
