कोल्हापुरातील धक्कादायक घटना
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा
एकतर्फी प्रेमात अडसर बनणाऱ्या मित्राला दगडाच्या खाणीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही घटना गेल्या बुधवारी (दि.3) केर्लेपैकी हनुमान नगरमध्ये घडली. महेंद्र प्रशांत कुंभार (वय 18) असं खून झालेल्या मुलाचं नाव असून सुरुवातीला हा अपघात असल्याचं निदर्शनास आलं होतं. मात्र पोलिसांच्या तपासादरम्यान हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यानुसार तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलीय.
आरोपीचं एकतर्फी प्रेम : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे येथील केर्ले गावात महेंद्र आणि अल्पवयीन संशयित आरोपी हे दोघं लहानपणीपासूनचे जिवलग मित्र होते. तर महेंद्रचं गावातील एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. मात्र त्याच मुलीवर संशयित आरोपीचं देखील एकतर्फी प्रेम होतं. दरम्यान, महेंद्र आणि मुलगी एकमेकांशी बोलतात, भेटतात आणि फिरत असल्याचा राग संशयित आरोपीच्या मनात होता. यावरूनच दोन्ही मित्रांमध्ये फेब्रुवारी महिन्यात जोरदार भांडण देखील झालं होतं.
125 फूट खोल खाणीत ढकलून दिलं : मंगळवारी रात्रीच्या सुमारास संशयित अल्पवयीन मुलानं महेंद्रला फोन करून खणीजवळ बोलावून घेतलं आणि दोघांमध्ये मुलीच्या विषयावरून पुन्हा वादाला सुरुवात झाली. संशयित आरोपीनं रागाच्या भरात महेंद्रचा मोबाईल हिसकावून घेऊन फोडला तसंच दुचाकीची चावी देखील फेकून दिली. शाब्दिक वादावादीचं रूपांतर हाणामारीवर झालं आणि या झटापटीत संशयित आरोपीनं महेंद्रला जोरदार धक्का देत 125 फूट खोल खाणीत ढकलून दिलं. बराच वेळ महेंद्र घरी आला नसल्यामुळं कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. यावेळी महेंद्र हा बेशुद्ध अवस्थेत खाणीत कुटुंबीयांना सापडला. त्याला तातडीनं त्याला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता.
खून केल्याची कबुली : या घटनेची माहिती करवीर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. कुटुंबीयांची चौकशी केली असता मित्राचा फोन आल्यानंतर महेंद्र घराबाहेर गेल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर महेंद्र आणि संशयित आरोपीचं मोबाईल लोकेशन डिटेल्स एकच दाखवत होतं. यावरून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, आपणच हा खून केल्याची कबुली त्यानं दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केलं असता संशयित अल्पवयीन आरोपीला न्यायालयानं पंधरा दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी केलीय. दरम्यान, मित्रानेच मुलीसाठी मित्राचा खून केल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त होतेय.
