Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

वैष्णवी हगवणे प्रकरणात सहआरोपी करण्यात आलेल्या निलेश चव्हाण याची पोलीस कोठडी संपल्यावर शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयात झालेल्या सुनावणीत निलेश चव्हाण याला 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. निलेश चव्हाण याला भारत – नेपाळ सीमेवरुन पोलिसांनी अटक केली होती.

निलेश चव्हाणला न्यायालयीन कोठडी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या हगवणे कुटुंबियांना याआधीच न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या प्रकरणात वैष्णवीचं बाळ लपवून बाळाची हेळसांड केल्याचा आरोप निलेश चव्हाण याच्यावर आहेत. या प्रकरणी निलेश चव्हाण याला सहआरोपी करण्यात आलं होतं. यानंतर निलेश चव्हाण हा पळून गेला होता. पोलिसांनी चव्हाण याला नेपाळ सीमेवरून अटक केली होती. आता या प्रकरणी निलेश चव्हाण याला न्यायालयानं 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बाळ हेळसांड प्रकरणाचा तपास करायचाय : न्यायालयात झालेल्या मागील सुनावणीत (3 जून) सरकारी वकिलांनी युक्तिवादामध्ये म्हटलं होतं की, ”निलेश चव्हाण याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आलाय. तसंच हगवणे कुटुंबियांचे 2 मोबाईल निलेशकडे आहेत. निलेश आणि हगवणे कुटुंबिय यांच्यात चॅटिंग झालं आहे. तसंच निलेश आणि हगवणे यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. वैष्णवीचे बाळसुद्धा निलेशकडं होतं. त्यानं त्या बाळाची हेळसांड केली आणि याचा तपास करायचा आहे.” अख्खं हगवणे कुटुंब कोठडीत : वैष्णवी हगवणे हिनं सासरकडून होणाऱ्या त्रासाला आणि छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी केला. हे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. आत्महत्येनंतर गुन्हा दाखल करत पोलिसांनी हगवणे कुटुंबियांना अटक केली होती. फरार असलेल्या निलेश चव्हाण यालाही नेपाळ सीमेवरुन अटक केली होती. हे सर्व आरोपी आता न्यायालयीन कोठडीत आहेत.