Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप करत निवडणूक चोरल्याचा हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्रातील लेखामध्ये विविध टप्प्यांमध्ये कथित षडयंत्राचा आराखडा मांडला. यामध्ये राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक 7.83 टक्के मतदान टक्केवारी वाढणं, ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी या सर्व घडामोडींना ‘मॅच-फिक्सिंग’ असल्याचं म्हटलं आहे. जिथं निकाल आधीच ठरवला होता. शेवटी ते मॅच फिक्स झालेली निवडणूक ही लोकशाहीसाठी विष असल्याचं मत मांडतात. या आरोपानंतर विविध पक्षातल्या राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रोजच्या आरोपांना काय उत्तर द्यायचं : ”मी बघितलं नाही, मी बघून सांगतो, ते रोजच आरोप करत आहेत. त्याला काय उत्तर द्याचं काय?” अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

निवडणूक आयोगाची वाट बघतोय : ”आज सकाळी मी आणि पवार साहेबांनी राहुल गांधी यांचा लेख वाचला आहे. त्यावर चर्चाही झाली. काँग्रेसनं यापूर्वी निवडणूक आयोगामध्ये धाव घेतली आहे. ही माहिती आयोगाला दिली आहे. त्यामुळं निवडणूक आयोगानं यामध्ये पारदर्शकपणे चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. त्यामुळं आता आम्ही निवडणूक आयोगाचे यावर काय उत्तर येते याची वाट बघतोय,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. लोकांना संभम नको, विकास हवा : ”राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर काही बोलता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचा संकल्प केला आहे. पुढील पंधरा-वीस वर्षे त्यांना काय समोर दिसत नाही. म्हणून ते सतत देशात महाराष्ट्रात संभम निर्माण करून त्यांचे राजकारण करत आहेत. लोकांना संभम नको तर विकास हवा आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासाच्या मुद्द्यावरून लोकांना सामोरे जात आहोत. राहुल गांधी जोपर्यंत पराभवाच्या छायेतून बाहेर येणार नाहीत तोपर्यंत त्यांचा पक्ष असाच कमजोर होत राहणार,” असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.