Spread the love

शिवसेना-मनसे युतीबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच काल उद्धव ठाकरे यांनी जे महाराष्ट्राच्या मनात आहे, ते होणार असल्याचं म्हटलंय. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. त्या म्हणाल्या की, ”उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत राज्याची सेवा करत असतील तर ही अतिशय आनंदची गोष्ट आहे.” दरम्यान, सुप्रिया सुळे या पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

निवडणूक आयोग काय उत्तर देतंय…: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार करण्यात आल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका माध्यमात लिहिलेल्या लेखात नमूद केलं आहे. त्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की, ”आज सकाळीच पवार साहेब आणि मी… आम्ही दोघांनी तो लेख देखिल वाचला आणि चर्चा देखील केली. काँग्रेस पक्ष हा याबाबत निवडणूक आयोगाकडे देखील जाऊन आलाय. याबाबत माहिती निवडणूक आयोगाकडे देण्यात देखील आलीय. या प्रकरणी पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेस पक्षानं केलीय. आता आम्ही वाट बघत आहे की निवडणूक आयोग काय उत्तर देतंय,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

प्रफुल्ल पटेल यांना मोठा अनुभव : येत्या 10 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, ”याबाबत कोर्टात केस चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वर्षांचा प्रवास हा संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर देशानं बघितलाय. यामुळं यावर वेगळं काही बोलायची गरज नाही.” दरम्यान, यावेळी दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत प्रफुल्ल पटेल तसंच सुनील तटकरे हे विरोध करत आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या की, ” प्रफुल्ल भाई आणि माझी अनेक विषयांवर भेट आणि चर्चा होत असते. मी आजही प्रफुल्ल पटेल यांचं मार्गदर्शन घेत असते. सभागृहाच खूप मोठा अनुभव त्यांना असून अनेक विषयात मी त्यांना फोन करून त्याचं मार्गदर्शन घेत असते. तसंच सुनील तटकरे यांची माझ्याशी बरेच दिवस झाले भेट झाली नाही,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. कार्यकर्त्यांना विचारून आम्ही टप्प्याटप्यानं पुढं जाऊ : याचबरोबर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, ”महायुती काय करेल हा त्यांच्या प्रश्न आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून कार्यकर्त्यांना विचारून आम्ही टप्प्याटप्यानं पुढं जाऊ,” असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.