तान्हुल्या बाळाला घेऊन माहेर गाठलं, घ्ऊ इंजिनीयर पतीच्या विकृतीने बीड हादरलं
बीड / महान कार्य वृत्तसेवा
मुलगी नकोय या बुरसटेलेल्या मानसिकतेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं.. मुलगी जन्माला आली म्हणून बीडच्या माहेरवासिनीला चक्क 15 दिवस उपाशीपोटी डांबून तिचा छळ करण्यात आला. घटना सुसंकृत मानल्या जाणाऱ्या पुण्यात घडली. संधी मिळताच तान्हुल्या बाळाला घेऊन विवाहितेने बीड गाठले आणि बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सासरच्या जाचातून सुटका होताना तरुणीला अश्रू अनावर
सासरच्या अमानुष जाचातून कशी सुटका झाली हे सांगताना अश्रू अनावर झालेली ही आहे शिवानी चंदनशिवे… हतबल आणि निराश होऊन तिने अखेर माहेरचा आसरा घेतला आहे. शिवानीचा विवाह पुण्यातील पिंपळा सौदागर येथील आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या निहाल चंदनशिवे याच्यासोबत मोठ्या धूमधडाक्यात झाला. लग्नाचे काही वर्ष चांगले गेले. यादरम्यान शिवानी गर्भवती राहिली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. आणि येथूनच खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्याला ग्रहण लागले. मुलगी जन्मला का घातली म्हणून पतीसह सासू – सासरा आणि दिराने मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. शिवानीला एका खोलीत उपाशीपोटी डांबून ठेवण्यात आले. आई वडिलांच्या सोबतीने तिने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून सासरच्या क्रूर विकृतीचा पाढा वाचला..
फोटोत दिसणारे हेच क्रूरकर्मा लोक आहेत, ज्यांनी मुलगी जन्मली म्हणून आभाळ डोक्यावर घेतले आहे. याच नराधमांनी पुण्याच्या संस्कृतीला बट्टा लावला. मुलीवर झालेला क्रूर छळ पाहून शिवानीचे कुटुंब देखील पुरतेच हादरून गेले आहे. मुलगी झाली म्हणून मुलीचे हालहाल करत जाच केला. मुलीची हाल अपेष्टा सांगताना तिच्या आईला अश्रू अनावर होत आहेत..
या प्रकरणी बीड पोलिसांनी पती निहाल चंदनशिवे, सासू निर्मला, सासरे अरुण चांदशिवेसह दीरावर गुन्हा दाखल केला. सर्वच आरोपींना लवकरच अटक करणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे. शिवानीची आप बीती ऐकल्यानंतर बीड पोलिस देखील चक्रावून गेले होते. शिवानीसोबत घडलेल्या क्रूर अत्याचार प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी देखील मदतीचा हात देत शेवटपर्यंत या प्रकरणात आम्ही साथ देण्याचा दावा केलाय.
