पुणे / महान कार्य वृत्तसेवा
आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पुणे तसेच राज्यातील इतर महापालिका निवडणुकीसाठी महायुती म्हणून भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात माझा चेहरा पुढं करून जनतेला सामोरं जाण्याचं काम करू, असं स्पष्ट करुन आपले मनसुबे उघड केले आहेत.
माझा चेहरा जरा बरा आहे – अजित पवार : उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोठ विधान केलं आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले की, ”आपल्याला जनतेला विश्वास द्यायचा आहे, की पुणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकमेव उपाय आहे. निवडणुकीत चेहरा लागत असतो आणि माझा चेहरा जरा बरा आहे. तो चेहरा पुढं करून पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये आपण आगामी निवडणुकीला सामोरं जाण्याचं काम करू.”
