Spread the love

भाजपचे 11 तर लाल बावट्याचे 2 सदस्य बिनविरोध

इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

इचलकरंजी महानगरपालिकेने पथ विक्रेता (फेरीवाला) समितीवर भाजपचे कमळ फुलले असून 13 पैकी 11 सदस्य बिनविरोध निवडून आले असून लाल बावटा खोकी धारक संघटनेचे दोन सदस्य ही बिनविरोध झाले आहेत. महापालिका झाल्यानंतर समितीच्या पहिल्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. दरम्यान, निवड झालेल्या सदस्यांना निवडपत्राचे वाटप आयुक्त तथा समिती अध्यक्षा पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

महानगरपालिका स्थापन झाल्या पासूनच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये भाजप प्रणित इचलकरंजी फेरीवाले विकास आघाडीचे अध्यक्ष दिपक पाटील यांनी या समितीमध्ये एकहाती सत्ता स्थापन केली आहे. इचलकरंजी महानगरपालिकाच्या नगर पथ विक्रेता समितीमध्ये 20 जणांचा समावेश आहे. पथ विक्रेत्यांच्या निवडणुकी द्वारे यापूर्वी 7 सदस्य निवडून आले होते. तर इतर विभागातून 6 अशासकीय सदस्य निवडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त  समितीच्या अध्यक्षा आहेत. तर पोलीस अधीक्षक, विशेष नियोजन प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी, सहायक पोलीस अधीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा,  मुख्य वैद्यकीय अधिकारी, अग्रणी बँक प्रतिनिधी असे 6 शासकीय अधिकारी सदस्य असणार आहेत.

इचलकरंजी फेरीवाले विकास आघाडीच्या सर्व 13 उमेदवारांची यामध्ये निवड झाली आहे. समिती मध्ये इचलकरंजी फेरीवाले विकास आघाडीचे अध्यक्ष दिपक पाटील यांच्या भाजपा प्रणीत कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी, फेरीवाले संघटनेचे 11 तर आघाडीचे गट नेते कॉ.सदाभाऊ मलाबादे यांच्या लाल बावटा खोकी धारक संघटनेचे 2 सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांना निवडीचे पत्र महापालिका आयुक्त तथा समिती अध्यक्षा पल्लवी पाटील यांच्या हस्ते शनिवारी देण्यात आले.

समितीच्या निवडीसाठी आघाडीचे मार्गदर्शक भाजप प्रदेश उपाध्यक्ष, आमदार सुरेश हाळवणकर यांचे विशेष सहकार्य लाभले असून खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार अशोकराव जांभळे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, भाजप शहराध्यक्ष अमृत मामा भोसले, कॉ.भरमा कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. या पत्र वाटप वेळी उपायुक्त अशोक कुंभार, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, नगरसेवक मनोज हिंगमिरे, जहांगीर पट्टेकरी, किसन शिंदे, मिळकत व मार्केट व्यवस्थापक श्रीकांत पाटील, लिपिक सदानंद गोनूगडे, अनिकेत राजापुरे आदी उपस्थित होते.

समिती नवनिर्वाचित सदस्य असे

दिपक पाटील, कॉ.सदाभाऊ मलाबादे, अश्विनी कुबडगे, सतीश नायडू, मनीष नायडू, राकेश माळी, लक्ष्मी कांबळे, वेणूताई पोवार, वासिम बागवान, समीर सोलापुरे, सुवर्णा कुसाळे, श्रीनिवास फुलपाटी, नितीन परिट यांचा समावेश आहे.