Spread the love

जोतिबा / महान कार्य वृत्तसेवा

जोतिबा डोंगर येथील श्री जोतिबा मंदिरात आठ जूनला सरत्या रविवारी निमित्त शेवटचा पालखी सोहळा होणार आहे.  7 जून पूर्वी येणारा रविवार हा सरता रविवार म्हणून साजरा केला जातो. परंतु यंदा मुग नक्षत्र आठ जूनला सुरू होत असल्याने सरता रविवार सोहळा 8 जूनला साजरा करण्यात येणार असल्याचे पुजाऱ्यानी सांगितले.

सरता रविवारी  दिवशी पालखी सोहळा रात्री साडे आठला निघणार आहे. त्यानंतर दसर्‍यातील खंडेनवमीलाच पालखी सोहळा सुरू होणार आहे. सरत्या रविवारी ग्रामस्थ, पुजारी सर्व देवतांना साखर-पेढे अर्पण करतात.भाविक श्री जोतिबाच्या पालखीवर मोठ्या प्रमाणात गुलाल-खोबऱ्याची उधळण करतात. मुलांना गुलाल खोबऱ्यांनी तुला करून नवस पुर्ण केला जातो. यानिमित्ताने डोंगरावर घरोघरी आमरस व पुरण पोळीचा नैवेद्य श्रींना दाखविण्यात येतो. या दिवशी विविध रंगीफुलांनी पालखी सजवली जाते व मंदिरात उंट, घोडे सजवून आणले जातात.

जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ, पुजारी मोठ्या भक्तिभावाने सरता रविवारसोहळा साजरा करतात. डोंगरावर या सोहळ्यास मोठे पारंपरिक महत्त्व आहे. सर्व गाव पालखी सोहळ्यास उपस्थित असते. नवीन कपड़े परिधान करून श्रींना आमरस पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. अशी माहिती जोतिबाचे पुजारी निलेश मिटके यांनी दिली.