इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी शनिवारी पवित्र बकरी ईद (इद उल अजहा) मोठ्या उत्साहात साजरी केली. स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सकाळी सामुहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव जमले होते. यावेळी जागतिक शांततेसह देशातील एकता व अखंडता तसेच जातीय सलोखा कायम राहून येणारी सर्व संकटे दूर व्हावीत यासाठी दुआपठण करण्यात आले. नमाज पठण झालेनंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे, पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रविंद्र कळमकर, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम समाजात रमजान ईद बरोबरच बकरी ईद सण उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज पठण केले जाते. मोठ्या संख्येने ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी जमले होते. मुफ्ती युसूफ मोमीन यांनी बयान पठण तर नमाज पठण विक्रमनगर मस्जिदचे हाफिज हुजेफा इलियास मुल्ला यांनी केले. हजरत सय्यद मखतूमवली दर्गा ट्रस्ट व ईदगाह ट्रस्ट यांचे वतीने नियोजन करण्यात आले होते. बादशाह बागवान व अहमद मुजावर यांनी आभार मानले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती.
