Spread the love

तरीही ‘ब्रेक फेल बैजा’ विक्रीस नकार!

दानोळी / महान कार्य वृत्तसेवा (अभय वाळकुंजे)

भिलवडी, ता. पलूस येथील बैलगाडा शर्यतीचा अष्टपैलू विजेता, ‘ब्रेक फेल बैजा’ नावाचा अस्सल खिलार जातीचा बैल सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. शर्यतीमधील दमदार कामगिरीसह रोख बक्षिसे, बुलेट गाड्या आणि ‘रुस्तम ए हिंदकेसरी’सारखे किताब पटकावणाऱ्या या बैलासाठी तब्बल ५५ लाखांची मागणी झाली आहे. मात्र, मालिकाने बैल विकण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

पलूस तालुक्यातील माळवाडी येथील राजू पाटील या ‘पाटील डेअरी’चे मालक, यांच्याकडे असलेल्या या बैलाने आजवर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शर्यतींमध्ये धडाकेबाज कामगिरी करत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याच्या नावावर हजारो चाहत्यांचा जमाव असून, शर्यतीत त्याच्या उड्डाणांची चर्चा गावोगावी होते.

या बैलासाठी नुकतीच शिरोळ तालुक्यातील दानोळी गावचे रामचंद्र शिंदे यांनी ५५ लाखांची थेट मागणी केली. ग्रामीण कला आणि बैलगाडा शर्यतीप्रती आपले प्रेम व्यक्त करत, “ग्रामीण संस्कृती टिकून राहावी व शेतकऱ्यांच्या जीवनात सुगीचे दिवस यावेत, यासाठीच या बैलाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला,” अशी माहिती शिंदे यांनी दिली.

विशेष म्हणजे, राजू पाटील यांनी हा बैल काही वर्षांपूर्वी २४ लाख रुपयांना विकत घेतला होता. त्यानंतर या बैलाने आपल्या अफाट ताकदीने आणि वेगाने अनेक शर्यती जिंकत आपले मोल सिद्ध केले. आज या बैलाची बाजारातली किंमत ५० लाखांच्या घरात गेली असली, तरी पाटील यांनी भावनेच्या नात्यामुळे विक्रीस नकार दिला आहे.

या संपूर्ण घडामोडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. बैलाचे उड्डाण, त्याचा डौल आणि चाहत्यांचा जल्लोष पाहून ग्रामीण महाराष्ट्र आणि कर्नाटकात या बैलाची लोकप्रियता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

‘ब्रेक फेल बैजा’ हा केवळ एक बैल नाही, तर ग्रामीण शौर्य, परंपरा आणि मेहनतीचे प्रतीक ठरला आहे. त्याच्या विक्रीला नकार देत राजू पाटील यांनी बैलाबद्दल असलेली आत्मीयता अधोरेखित केली आहे, आणि यामुळेच हा किस्सा ग्रामीण महाराष्ट्रात एक आदर्श ठरत आहे.