Spread the love

पालिका प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजनांकडे दुर्लक्ष

कुरुंदवाड / महान कार्य वृतसेवा

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले तबक मैदान हे कुरुंदवाड शहरातील एकमेव मोठे मैदान असून, खेळाडूंसाठी व नागरिकांसाठी हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही अवकाळी पावसाने मैदानात पाणी साचले असून, पूर्ण मैदान तळ्यात रूपांतरित झाले आहे. या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक व क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

तबक मैदानात पावसाचे पाणी साचण्याचा हा प्रश्न नविन नाही. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात व अवकाळी पावसात हेच चित्र पाहायला मिळते. परिणामी, मैदान खेळण्यासाठी अनुपयुक्त ठरते. शालेय क्रीडा स्पर्धा, स्थानिक क्रीडाप्रशिक्षण तसेच युवकांचे दैनंदिन व्यायाम यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

प्रशासन दरवर्षी या पाण्याच्या निचऱ्यासाठी तात्पुरते पंपिंग यंत्र लावते, काही वेळा श्रमदानाच्या माध्यमातून पाणी बाहेर काढले जाते. यासाठी नगरपालिका खर्चही करते, परंतु यामध्ये सातत्य नाही आणि समस्येचे मुळातून निराकरण होत नाही. नागरिकांचा आरोप आहे की, हे सर्व उपाय तात्पुरते असून यामागे दूरगामी दृष्टीकोनाचा अभाव आहे.

या मैदानात पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी भूमिगत जलवाहिनी प्रणाली, जलनिकासी चॅनेल किंवा झाकी ड्रेनेज सिस्टम उभारणे शक्य आहे. मात्र आजवर कोणतीही ठोस योजना आखण्यात आलेली नाही. मैदानाच्या चारही बाजूंनी पाण्याचा प्रवाह अडवणाऱ्या रचना आणि निकृष्ट जमिनीमुळे पाणी दीर्घकाळ साचून राहते.

तबक मैदानाव्यतिरिक्त कुरुंदवाड शहरात कोणतेही सार्वजनिक मैदान उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानिक क्रीडापटूंचे प्रशिक्षण, मैदानी खेळ आणि स्पर्धांचे आयोजन यावर मर्यादा येतात. तरुणाईला खेळासाठी पर्यायी जागा मिळत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने या एकमेव मैदानाबद्दल पाणी निचरा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबवावी अशी मागणी नागरिक व खेळाडूतून होत आहे.