Spread the love

निषेध मोर्चानंतर पोलीस प्रमुखांकडून कारवाई पथकाची स्थापना

सांगली / महान कार्य वृत्तसेवा (आदी माने)

सांगली येथील आदित्य मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली होती. आंदोलकांनी घोषणाबाजी करत रुग्णालयाच्या काचांवर दगडफेक करत रुग्णालयातील कर्मचारी वर्गावर हल्ला करत वैद्यकीय साहित्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण १७ जणांना ताब्यात घेतले आहे.

आदित्य हॉस्पिटल वरील तोडफोड विरोधात जिल्ह्यातील डॉक्टर, तसेच विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्याफिती बांधून गुरुवारी सांगली पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला होता.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत डॉक्टरांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपद्रवी मंडळीकडून डॉक्टरांना संरक्षण आणि रुग्णालयाची तोडफोड रोखण्यासाठी दखल घेण्याची पोलीस प्रमुखांकडे सांगली, मिरज तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने मागणी केली.

या घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीतील हॉस्पिटलवर होणारे हल्ले आणि त्रास रोखण्यासाठी होम डिवाएसपींच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्याची जिल्हा पोलीस प्रमुखांनी घोषणा केली. तसेच जिल्हा पातळीवर आणि प्रत्येक तालुक्यात समिती नेमून समितीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह डॉक्टर संघटनांकडून येणाऱ्या सदस्यांचाही समावेश करू असे सांगितले. तसेच डॉक्टर शरद सावंत यांच्या हॉस्पिटलवर हल्ला करणाऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल असून त्यांची लवकरच हद्दपारची कारवाई करू, असे आश्वासनही पोलीस प्रमुखांनी डॉक्टरांना दिले.