मेंढपाळाचे नव्वद हजाराचे नुकसान, वनविभागाकडून पंचनामा
पट्टण कोडोली / महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली येथे तरसदृश्य प्राण्याने मेंढ्यांच्या काळपावर हल्ला करून पाच मेंढ्यांचा फडश्या पाडला आहे. यामध्ये मेंढपाळाचे नव्वद हजाराचे नुकसान झाले आहे. हैदरमाळावरून जाणाऱ्या कुंभार पानंद रस्त्यालगत असणाऱ्या प्रकाश नावलगी यांच्या घरासमोरील शेतामध्ये नवनाथ बेळगे या मेंढपाळाच्या मेंढया बसण्यासाठी आहेत.
काल सायंकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे बेळगे हे आपल्या मेंढ्याना सुरक्षित ठेऊन घरी जेवणासाठी आले होते. मध्यरात्री तरससदृश्य प्राण्याने या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून या कळपातील पाच मेंढ्यांचा फडशा पाडला आहे. तर एक मेंढी जखमी झाली आहे.
आज सकाळी नवनाथ बेळगे आपल्या बग्यावर आल्यानंतर सदर बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी लगेच हातकणंगले वनविभागाला घटनेची माहिती दिली यानंतर हातकणंगले वनविभागाचे वनपाल संजय कांबळे, मंगेश वंजारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मृत झालेल्या सर्व मेंढ्या ह्या गाभण अवस्थेत होत्या यामध्ये मेंढपाळचे साधारण 80 ते 90 हजाराचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नवनाथ बेळगे या मेंढपाळाला शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवी अशी मागणी होत आहे. जखमी असलेल्या मेंढीवर पशुवैद्यकीय अधिकारी दीपाली भुटकर यांनी उपचार केले आहेत. यावेळी पोलीस पाटील मोहनकुमार वर्धन, लक्ष्मण पुजारी, शिरपा कांबळे, बाळासो नावलगी, संतोष बाळाई, ओम पिराई आदिंसह मेंढपाळ, शेतकरी उपस्थित होते.
तरससदृश्य प्राण्याने नारायण बेळगे यांच्या ५ मेंढ्याना ठार केले आहे याचा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष पंचनामा केला आहे. सदर मेंढपाळाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे.
संजय कांबळे (वनपाल हातकणंगले )
