विनाअनुदानित कृती समिती कडून दिंडीस प्रारंभ ; वाढीव टप्पा निधीची तरतूद करण्याची मागणी
राधानगरी / महान कार्य वृत्तसेवा
राज्यातील ५० हजार शिक्षकांना १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान मिळावे, १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा. या प्रमुख मागण्यासाठी विनाअनुदानित कृती समितीचे शिक्षक एकवटले असून राज्यातील पालकमंत्र्यांच्या घरी पायी दिंडी काढून मागण्यांचे निवेदन देणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुर जिल्ह्यातील शिक्षकांनी गांधीगिरी दाखवत कोल्हापूर ते गारगोटी पायी दिंडी काढून शिक्षकांच्या प्रश्नांकडे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रत्यक्षात या पायी दिंडीस गुरुवारी सकाळी कोल्हापूर येथून सुरुवात करण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी दसरा चौक कोल्हापूर येथून पायी दिंडीची सुरुवात झाली. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य विनाअनुदान शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे, सांगली जिल्हाध्यक्ष संदीप काळे, केदारी मगदूम हे करीत आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी ही दिंडी धडकणार आहे. दरम्यान दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दिंडीस सुरुवात झाली. शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शिक्षक भारतीचे दादासाहेब लाड, भरत रसाळे, के.के.पाटील यांनी दिंडीत सहभाग घेतला. आणि आपल्या मनोगतातून तातडीने अनुदान वितरित करण्याची मागणी सरकारकडे केली. यावेळी शिक्षकांनी अनुदान मागणी संदर्भात घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
जीआर निघतो परंतु निधीचा प्रश्न जैसे थे!
शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळत असून शेकडो आंदोलन केल्यानंतर वाढीव टप्प्याचा जि आर निघतो मात्र त्यासाठी निधीची तरतूद वर्षभर होत नाही. आणि मग शिक्षकांना यासाठी पुन्हा आंदोलन करावे लागते ही शोकांतिका आहे. शासन स्तरावर सध्या टप्पा अनुदान घेत असलेल्या राज्यातील सरकारमान्य खासगी अंशत: अनुदानित शाळांना २० टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करण्याचा शासन निर्णय १४ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आला. या निर्णयानुसार राज्यातील खासगी अंशत: अनुदानित ज्या शाळांनी निकषांची पूर्तता केली आहे, अशा ८२० प्राथमिक शाळा, तीन हजार ५१३ वर्ग/ तुकड्या व त्यावरील आठ हजार ६०२ शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, एक हजार ९८४ माध्यमिक शाळा, दोन हजार ३८० वर्ग/तुकड्या व त्यावरील २४ हजार २८ शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, तीन हजार ४० उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय, तीन हजार ४३ वर्ग/तुकड्या/ अतिरिक्त शाखा व त्यावरील १६ हजार ९३२ शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी विविध टप्प्यावर वेतन अनुदान घेत आहेत. त्यांची एकूण संख्या ८४४ शाळा, आठ हजार ९३६ वर्ग/तुकड्या/अतिरिक्त शाखा व त्यावरील एकूण ४९ हजार ५६२ शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी एवढी आहे. त्यांना २० टक्के अनुदानाचा पुढील टप्पा जाहीर करण्यात आला. परंतु आठ महिने उलटून सुद्धा शासनाने याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही आणि निधीची तरतूद केलेली नाही.
५८ किमीहून अधिक पायपीट
या दिंडीमध्ये नियमित ५८ किलोमीटरचे अंतर कापले जाणार आहेत. विनाअनुदानित शाळा कृती समिती पदाधिकारी, महिला शिक्षक यांचेसह शेकडो शिक्षक सहभागी झालेले आहेत. ज्या ठिकाणी रात्र होईल त्या गावातच मुक्कामाचे नियोजन केले आहे. पायी दिंडीस साधारणपणे दोन दिवसाचा कालावधी लागू शकतो.
मंत्रिमंडळाने निर्णय घ्यावा
चौकट – राज्य सरकारकडून टप्पा अनुदान घेत असलेल्या खासगी, अंशत: अनुदानित शाळांना २० टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर झाला आहे. त्याची जून २०२४ महिन्यापासून अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय झाला. याचा राज्यातील ४९ हजार ५६२ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना फायदा होणार आहे. मात्र, हिवाळी, उन्हाळी अधिवेशनात आर्थिक तरतूद न झाल्याने विनाअनुदानित शिक्षक नाराज आहेत. येत्या अधिवेशनात शासनाने तात्काळ याची अंमलबजावणी करावी .
खंडेराव जगदाळे, उपाध्यक्ष, राज्य विनानुदानित शाळा कृती समिती
राज्य सरकारने २००१ पासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर शाळांना मान्यता दिली आहे. त्यानंतर २००९ ला ‘कायम’ शब्द वगळण्यात आला. विनाअनुदानित शिक्षकांनी आंदोलने, मोर्चे काढले. त्यानंतर २०१६ मध्ये अनेक शाळांना अनुदानाचा पहिला टप्पा मिळाला. त्यानंतरही शिक्षकांना वाढीव अनुदानासाठी संघर्ष करावा लागला. गेल्या १ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२४ मध्ये शिक्षकांनी राज्यव्यापी ७५ दिवसांचे बेमुदत आंदोलन केले. तर आतापर्यंत या शिक्षकांनी वेगवेगळी ३०० आंदोलने केली आहेत.
शिवाजी कुरणे, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर
यावेळी दादा लाड, एस डी लाड, भरत रसाळे,शिवाजी माळकर, के के पाटील उदय पाटील केदारी मगदूम, शशिकांत खडके, अनिल ल्हायकर,हेमंत धनवडे, जालिंदर कांबळे, अरविंद पाटील, प्रभाकर कुपले, भानुदास गाडे ,नेहा भुसारी,भाग्यश्री राणे, जयश्री पाटील, रेखा संकपाळ,यासह शेकडो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
