राज्य सरकारचे असंवेदनशील वर्तन धक्कादायक
पुणे : महान कार्य वृत्तसेवा
क्रीडा विश्वात बंगळूरूतील घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. परंतु, प्रशासन आणि पोलीस दलाच्या गलथान व्यवस्थापणामुळे बुधवारी, एम चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ क्रिकेट चाहत्यांचा मृत्यू झाला; असा आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला. नैतिकतेच्या आधारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली.
चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या आणि गंभीर जखमी असलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने तात्काळ आर्थिक मदत करावी, असे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव करीत ‘आरसीबी’ने विजय मिळवला. संघाचा सत्कार समारंभ चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, ३५ हजार क्षमता असतांना देखील जवळपास २ ते ३ लाख क्रिकेट चाहते या ठिकाणी जमले होते. एवढ्या मोठ्या संख्येत क्रिकेट चाहत्यांना का एकत्रित होऊ देण्यात आले? गर्दी नियंत्रणात आणण्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती का? असा सवाल उपस्थित करीत प्रशासन आणि पोलीस यंत्रणा फोल ठरल्यामुळे याची जवाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
चाहत्यांची गर्दी आवक्या बाहेर गेल्याने त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. मुळात पोलिसांनी बळाचा वापर केल्याने चेंगराचेंगरी झाली, असा आरोप पाटील यांनी केला. बीसीसीआय ने देखील या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी.एकीकडे क्रिकेट चाहत्यांचा मृत्यू झाला आणि दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी आरसीबी संघाचा सत्कार केला.हॆ मुख्यमंत्र्यांचे असंवेदनशील व्यक्तिमत्व दाखवून देणारे आहे, असे मत व्यक्त करीत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनामा देण्याच्या मागणीचा पुनःरोच्चार केला.
