ड्रोन आणि एआयचा सुद्धा वापर
श्रीनगर / महान कार्य वृत्तसेवा
अमरनाथ यात्रा दरवर्षी लाखो भाविकांसाठी एक पवित्र प्रसंग आहे. ही यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू होणार असून 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देशभरातून लाखो भाविक अमरनाथ यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. 38 दिवस चालणारी ही यात्रा जम्मू आणि काश्मीरच्या दोन मुख्य मार्गांनी पवित्र अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचते. एक मार्ग पहलगाम येथून आहे, जो जवळपास 48 किमी लांब आहे. तर दुसरा मार्ग बालटाल येथून आहे, जो 14 किमीचा लहान पण कठीण मार्ग आहे.
42,000 हून अधिक जवान तैनात : या वर्षी सुरक्षेकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये पहलगाममध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर सरकारनं अमरनाथ यात्रेची सुरक्षा वाढवली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये 42,000 हून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. हे जवान सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबी सारख्या केंद्रीय निमलष्करी दलातील आहेत.
सुरक्षेसोबतच इतर आवश्यक तयारीही सुरू : सुरक्षेसाठी केवळ जवान तैनात करणेच नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जात आहे. विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात आहे आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. कोणताही धोका येण्यापूर्वीच त्याला तोंड देता यावं म्हणून सुरक्षा यंत्रणा आणि लष्कर एकत्र काम करत आहेत. सुरक्षेसोबतच इतर आवश्यक तयारीही सुरू आहे. रस्ते दुरुस्ती, वैद्यकीय शिबिरे, आपत्कालीन सेवा आणि गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन आणि लोकांच्या मदतीने, प्रवासादरम्यान कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
समुद्रसपाटीपासून 3,888 मीटर उंचीवर : गेल्या वर्षी अमरनाथ गुहेत विक्रमी 5.12 लाख भाविक पोहोचले होते. यावर्षी ही संख्या आणखी वाढू शकते. अमरनाथ गुहा समुद्रसपाटीपासून 3,888 मीटर उंचीवर आहे. सरकारचं म्हणणं आहे की, ही यात्रा केवळ श्रद्धेचं उदाहरण नाही तर देशाच्या एकतेचं आणि धैर्याचंही उदाहरण आहे. आम्ही केवळ यात्रेकरूंचं रक्षण करत नाही तर आमच्या शतकानुशतकं जुन्या परंपरा आणि श्रद्धेचंही रक्षण करत आहोत. दरम्यान, यावर्षीच्या अमरनाथ यात्रेत भाविकांसाठी सर्व सुरक्षा आणि सोयीची व्यवस्था करण्यात आली आहे. जरी हा प्रवास शारीरिकदृष्ट्या कठीण असला तरी, सुरक्षेची योग्य तयारी आणि इतर व्यवस्था करून प्रवास आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
