Spread the love

ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा, कारणही सांगितलं….

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्याच्या राजकारणात मागील काही काळात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‌‍वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. काही राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू होणार आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने मोठा दावा केला आहे. आपल्याला भाजपच्या 27 आमदारांनी फोनवरून संपर्क साधला असल्याचा दावा या नेत्याने केला आहे. त्या मागचे कारणही या नेत्याने सांगितले.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबतचे ट्वीट केले आहे. संजय राऊत यांनी लिहिलेलं ‘नरकातला स्वर्ग’ हे आत्मकथन सध्या राजकीय आणि साहित्यिक वर्तुळात प्रचंड गाजत आहे. या पुस्तकाची उत्सुकता इतकी वाढली आहे की, खुद्द राऊत यांनीच भाजपचे 27 आमदार त्यांच्याशी संपर्कात आल्याचा दावा ट्विटरवर केला आहे.

संजय राऊतांनी कारण सांगितलं…

”हे पुस्तक सगळ्यांसाठी आहे! आतापर्यंत मला 27 भाजपा आमदारांचे फोन आले; ‘नरकातला स्वर्ग’ एका बैठकीत वाचून काढले, हे सांगण्यासाठी!” असं संजय राऊत यांनी म्हटले.

संजय राऊत यांनी हे वक्तव्य करताना मनसे नेते संदीप देशपांडे यांचे एक ट्विट रिट्विट केले. विशेष म्हणजे संदीप देशपांडे हे स्वत: ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक वाचत असल्याचा फोटो त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला होता. राऊतांनी तेच ट्विट शेअर करत आपल्या पुस्तकाच्या स्वीकाराचा आणि चर्चेचा आलेख उंचावल्याचे सूचित केलं. ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक ईडीच्या कारवाई, तुरुंगातील अनुभव, तसेच महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा आंतरंग उलगडतं. त्यामुळेच या पुस्तकाबाबत केवळ वाचकांमध्येच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही प्रचंड कुतूहल आहे. सध्या या पुस्तकाच्या माध्यमातून संजय राऊत पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.