Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

सलग चौथ्या दिवशी सोन्याचा बोलबाला स्पष्ट झाला आहे. आज पुन्हा एकदा सकाळी सोन्याच्या भावात थेट 43 रूपये प्रति ग्रॅम भाववाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय दबाव, अमेरिकेतील ढासळलेले खाजगी क्षेत्र, डॉलरच्या किंमतीत घट, आंतरराष्ट्रीय बाजारातील आर्थिक अनिश्चितता, वाढलेली सोन्यातील गुंतवणूक अशा अनेक कारणांमुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

‘गुड रिटर्न्‌‍स ‘ संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या 24 कॅरेट प्रति ग्रॅम दरात 43 रूपयांनी वाढ होत तोळ्याची किंमत 99600 रूपयांवर पोहोचली आहे तर 22 कॅरेट सोने प्रति ग्रॅम किंमत 40 रुपयांनी वाढत 9130 रूपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे एक तोळयाची किंमत 91300 रूपयांवर पोहोचली आहे. तर 18 कॅरेट प्रति ग्रॅम किंमत 32 रूपयांनी वाढत 7470 रुपयांवर पोहोचला तर तोळा किंमत 74700 रूपयावर पोहोचली आहे.

चांदीच्या किंमतीतही प्रति ग्रॅम 2 रूपयांची वाढ होत प्रति किलो चांदीची किंमत 104000 रूपयांवर पोहोचली आहे.एप्रिलमध्ये या मौल्यवान धातूची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. तथापि, मे महिन्याच्या पहिल्या सहामाहीत किमती कमी झाल्या आणि महिन्याच्या दुसऱ्या सहामाहीत मात्र सोन्याचांदीच्या दरात वाढ झाली आहे. तथापि एमसीएक्स (चउद) वर सोन्याच्या निर्देशांकात 0.36 टक्क्याने घट होत सोन्याची पातळी 98226.00 वर पोहोचली असून चांदीच्या निर्देशांकात 0.12 टक्क्याने वाढ होत 101500.00 पातळीवर चांदी पोहोचली आहे.

अमेरिकन बाजारातील मंदी व सोने दरवाढीनंतर आता भारतात, अर्थतज्ज्ञ 4 जून रोजी सुरू झालेल्या रिझर्व्‌‍ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीची आतुरतेने वाट पाहत असतील. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली होणारी आरबीआय एमपीसी बैठक शुक्रवार 6 जून रोजी संपेल. यावरून सोन्याचीही पुढील दिशा स्पष्ट होईल.