शनिवारी जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालयाला घेराव
पेठ वडगाव / महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले तालुक्यातील वाठार येथील मातंग समाजातील नागरिक प्रकाश दबडे यांच्यावर झालेल्या बेदम मारहाणीप्रकरणी निष्काळजी तपास करणाऱ्या पोलिस हेडकॉन्स्टेबल कुमार पोतदार यांना तत्काळ निलंबित करावे, अन्यथा शनिवार 7 जून रोजी जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी दिला आहे.
बंडखोर सेना पक्षाच्या वतीने वडगाव पोलिस ठाण्यासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपाताई वायदंडे यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. प्रकाश दबडे यांना 13 मे रोजी वाठारमधील देशी दारू दुकानात किरकोळ कारणावरून दुकान मॅनेजर मिलिंद घोलप व एका अनोळखी इसमाने मारहाण केली होती. यामध्ये दबडे यांचे पाय व हात फॅक्चर झाले असून, त्यांच्यावर सीपीआर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत. परंतु तपासी अंमलदार पोतदार यांनी नऊ दिवसांपर्यंत मेडिकल सर्टिफिकेटची मागणीही केली नाही. तसेच पंचनामा करताना मारहाणीस वापरलेली फायबर काठीही जप्त केली नाही. या प्रकरणी कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर दुसऱ्यांदा पंचनामा करून काठी जप्त करण्यात आली. तसेच सिसिटीव्ही फुटेज पूर्ण न घेतल्याचा आरोपही करण्यात आला. तपासातील निष्काळजीपणा व आरोपींना सहकार्य करणारी भूमिका घेतल्याने पोतदार यांच्यावर कारवाईची मागणी झाली आहे. यावेळी पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी निवेदन स्वीकारून पोतदार यांच्यावरील अहवाल 24 तासात सादर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बंडखोर सेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी पेठवडगावहून संतोष पाटील.
आरोपींवर कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा
पो.कॉ.पोतदार यांना सेवेतून निलंबित करून खातेनिहाय चौकशी करा
निरीक्षक विलास भोसले यांच्यावर विभागीय चौकशी करावी
सदर दारू दुकान तात्काळ बंद करा
