Spread the love

नागरिकांची पाटबंधारे विभागाकडे मागणी

खाजगी मत्स्यपालन केंद्रातील चिलापीने गिळले इतर प्रजातींचे मासे

राधानगरी / महान कार्य वृत्तसेवा

राज्यातील अनेक तलाव आणि त्यापासून प्रवाहीत नद्यांमध्ये चिलापी या प्रजातीचा मासा व तोही मोठ्या संख्येने मिळून येत आहे. प्रदूषित पाण्यातही चिलापी तग धरून राहतो व गुणाकारात वाढतो. इतर माशांना मात्र तो जगू देत नाही. त्यामुळे खवय्यांना खुणावणारे गावरान वाम, कटला, रावस, मरळ, खवली हे मासे जलाशयांतून हद्दपार झाले आहेत. राधानगरी तालुक्यातील धामोड येथिल तुळशी जलाशयात तर या प्रजातींच्या माशांचा खचच्या खच आढळून येत आहे.

२०१८-१९ पासून या तलावात एक खाजगी मत्स्य पालन केंद्र आहे. तीन चार वर्षापूर्वी या मत्स्य पालन केंद्राची जाळी फाटून हजारो संकरित मासे या जलाशयात सर्वदूर पसरले आणि त्यांनी स्थानिक मासे गिळंकृत केले. तेव्हापासून स्थानिक मासेमारी करणाऱ्यांना जाळ्यात आणि गळाने मासेमारी करणाऱ्यांना निव्वळ चिलापीच मासे सापडत आहेत. माशांच्या स्थानिक प्रजाती वाचवण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने या तलावात स्थानिक प्रजातीचे मत्स्यबीज सोडावे, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे तलाव आणि नदीच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणात वाढ होणार असून मासेमारीला चांगले दिवस येणार आहेत. पावसाळ्यात दररोज शेकडो किलो माशांची विक्री होत असल्याचे मासेमारी करणाऱ्यांनी सांगितले. मिळून येणाऱ्या माशांमध्ये चिलापीचा समावेश सर्वाधिक आहे. इतर सर्वच मासे आता नामशेष झाल्यात जमा आहेत. जाळे टाकले की त्यात केवळ चिलापी अडकणार हे ठरलेले. इतर प्रजातीचे केवळ चार-दोन मासेच मिळून येतात.

चिलापीची डुक्करमासा या नावाने वेगळी ओळख आहे. खाऱ्या, गोड्या किंवा अतिशय प्रदूषित पाण्यातही तो टिकून राहतो. त्यामुळेच डुक्करमासा हे नाव त्याला चिकटले. एखाद्या नदीत अथवा जलाशयांत तो घुसला की तेथे स्वत:चे प्रस्थ वाढवितो. पाण्यातील शेवाळ तर खातोच, मात्र वेळप्रसंगी इतर माशांची अंडीही फस्त करतो. चिलापीची उत्पादनक्षमता अफाट आहे. त्याची आक्रमकता आणि गुणवैशिष्ट्यांमुळे इतर माशांवर मात्र संक्रांत आली आहे. ते पूर्णत: नामशेष होण्याची भीती येथिल नागरिक व्यक्त करत आहेत.

चौकट

मत्स्यपालन करण्यापुर्वी येथे रोहु, मिरगल, खडस, खऊल, ओंबट, झिंगा व मळव्या इ. स्थानिक जातीचे मासे मुबलक प्रमाणात सापडत होते. पण संकरीत माशांनी स्थानिक मासे खाल्ल्यामुळे या स्थानिक प्रजाती नामशेष होत चालल्या आहेत. चिलापीचे आक्रमण थोपविणे गरजेचे आहे. स्थानिक माशांच्या जाती जतन कराव्या लागतील. त्यासाठी पाटबंधारे विभागाने मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहकार्याने तातडीने उपाययोजना राबवाव्यात. अन्यथा फार उशीर होईल.

एम डी फडके, सामाजिक कार्यकर्ते, धामोड