जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
शिरोळ तालुक्यातील संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाने आपली यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवुन तालुक्यातील जीवित व वित्तहानी होवू नये यासाठी, सतर्क रहावे, असे स्पष्ट निर्देश आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले. जयसिंगपूर येथील स्वर्गीय शामरावअण्णा पाटील नाट्यगृहात आयोजित संभाव्य महापुराच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही महापुराची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने ग्रामस्थांच्या निवाराशेडची पूर्वतयारी करावी. जनावरांचे सुरक्षित स्थलांतर, त्यांच्यासाठी चाऱ्याची व्यवस्था व स्थलांतराच्यावेळी होणाऱ्या वाहन भाड्यावरील वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरटीओ विभागाने विशेष लक्ष ठेवावे, असे त्यांनी सांगितले.
महापुराला अलमट्टी धरण जबाबदार आहे. त्यामुळे या धरणाची उंची वाढवू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. याशिवाय महापुराच्या काळात केंद्रीय जल आयोगाचे निकष आहेत, त्यांचे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांनी पालन करुन पाणी विसर्ग होण्याबाबत समन्वय ठेवावा. असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, रस्ते दुरुस्ती नाल्यातील पाण्याचा निचरा महापूर येण्याअगोदर झाले पाहिजेत याची संबंधितांनी नोंद घेऊन कारवाई तात्काळ करावी. शिरोळ तालुक्यातील प्रशासनाने त्यांच्या ताफ्यातील बोटींची डागडुजी तातडीने करून घ्यावी. नवीन बोटींची आवश्यकता असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी संपर्क साधून ती व्यवस्था करावी. विशेषतः पुरप्रवण भागांतील शासकीय अधिकारी, ग्रामपंचायती, पोलीस व कृषी विभाग यांनी एकत्रितपणे समन्वय ठेवून उपाययोजना राबवाव्यात. पूर्वसूचना देऊन स्थलांतराचे नियोजन करणे, निवारा शेडची उभारणी, जनावरांसाठी जागा निश्चित करणे व चाऱ्याची सोय करणे हे काम गांभीर्याने पार पाडावे. उपाययोजना राबवताना कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी तालुक्यात उपलब्ध असलेल्या जवान, बोटी, निवारा शेड व जनावरांच्या छावण्यांची माहिती सादर केली. त्यांनी सांगितले की, कुरुंदवाड येथील एसपी हायस्कूल, टाकळीवाडी येथील गुरुदत्त कारखाना, शिरोळ येथील दत्त कारखाना, कवठेगुलांद येथील लालबहादूर शास्त्री विद्यालय, पदमाराचे विद्यालय तसेच जयसिंगपूर शहरातील विविध शाळा व महाविद्यालये यांना निवाराशेडसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
गटविकास अधिकारी नारायण घोलप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान हाके व शिवाजी गायकवाड यांनीही पूरस्थितीत राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावे, यावर भर देण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर यांनी आरोग्य विभागाकडून उपाययोजनांची माहिती दिली.
या बैठकीला शिरोळ तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, पूरप्रवण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी प्रशासनाच्या तयारीविषयी समाधान व्यक्त केले.
