हातकणंगले / महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले विधानसभा मतदार संघातील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक दलितमित्र आमदार डॉ.अशोकराव माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर, अपूर्ण आणि प्रस्तावित कामांबाबत हातकणंगले विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील नागरिकांच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याने कार्यसम्राट आमदार डॉ.अशोकराव माने यांनी याविषयी तात्काळ बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश संबंधित विभागास दिले होते. त्याप्रमाणे पंचायत समिती हातकणंगले येथील सभागृहामध्ये आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या अध्यक्षतेखाली, गटविकास अधिकारी श्रीमती शबाना मोकाशी यांचे उपस्थितीत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व अन्य संबंधित विभाग तसेच संबंधित गावचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ठेकेदार यांची संयुक्तिक बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीमध्ये निलेवाडी, भेंडवडे, चावरे, चोकाक, जंगमवाडी, खोची, कुंभोज, माले, मुडशिंगी, पाडळी, प.कोडोली, रुकडी, शिरोली, भादोले, हेर्ले, इंगळी, माणगाव, मनपाडळे, नागाव, नवेपारगाव, नेज, जुने पारगाव, रांगोळी, रुई, संभापूर, तळंदगे, तळसंदे, टोप इत्यादी गावातील जलजीवन योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार डॉ.अशोकराव माने म्हणाले, पाणी म्हणजे जीवन आहे. मतदार संघातील जनतेला शुध्द आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देणे आमचे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे म्हणून या गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि ठेकेदार यांची ही संयुक्त बैठक घेण्याचे ठरविले. आजच्या या बैठकीमध्ये एकदम चांगले विषय सामोरे आले. गावपातळीवरील अडचणी, शासन स्तरावरील अडचणी, ठेकेदारांच्या काही अडचणीबाबत अगदी उत्तम पध्दतीने चर्चा झाली. सगळयांचा प्रतिसाद चांगला मिळाला. यापुढेही सर्वांनी एकत्रित मिळुन लोकहिताची कामे करावीत… प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करावे. मतदार संघातील जलजीवन मिशन योजनेची कामे तातडीने पूर्ण करावीत. लागणाऱ्या निधीसाठी शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली. योजनेच्या वाढीव खर्चाचे प्रस्ताव एकत्र सादर करून मंजूरी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. माणगाव सरपंच राजू मगदूम यांनी आभार मानले.
यावेळी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी श्रीमती शबाना मोकाशी, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, संबंधित शाखा अभियंता, अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.
