Spread the love

ओस्लो / महान कार्य वृत्तसेवा

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीत डोमराजू गुकेशने मॅग्सन कार्ल्‌‍सनवर आश्चर्यकारक विजय मिळवला. डी गुकेशचा मॅग्नस कार्लसनविरुद्धचा विजय ऐतिहासिक होता कारण त्याने पराभवाच्या छायेत असतानाच हा विजय खेचून आणला. या विजयानंतर मात्र कार्लसने पराभवाचा राग व्यक्त केला ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. गुकेशकडून पराभूत झाल्यानंतर कार्लसने जोरात चेस टेबलवर आपला हात आदळला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 दोन वर्षांत दुसऱ्यांदा, एका भारतीयाने नॉर्वे बुद्धिबळात मॅग्नस कार्लसनला हरवून पहिला विजय नोंदवला आहे. आठवड्यापूर्वीच मॅग्नस कार्लसनने नॉर्वे बुद्धिबळाच्या पहिल्या फेरीत विश्वविजेता डी गुकेशला हार मानण्यास भाग पाडले होते. त्यानंतर गुकेशने सोशल मीडियावर एक पोस्ट करत, जेव्हा तुम्ही राजाच्या जवळ जाता तेव्हा अजिबात चुकू नका असं म्हटलं होतं. त्यानंतर रविवारी (दि.1) रात्री उशिरा स्टॅव्हॅन्गर येथे गुकेशने नेमके हेच केले. 19 वर्षीय डी गुकेशने जगातील नंबर 1 वर विजय मिळवण्यासाठी 62 चाली खेळल्या आणि त्याला पराभूत केले. या सामन्यात गुकेशकडून पराभव झाल्यानंतर मॅग्नस कार्लसनची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. त्याच वेळी, गुकेश खूप शांत दिसत होता. कार्लसनने सामन्यात गुकेशवर वर्चस्व गाजवले होते, परंतु शेवटी गुकेशने चाल खेळून त्याला पराभूत केले. त्यामुळे कार्लसन निराश झाला आणि त्याने जोरात आपला हात चेस टेबलवर आदळला. त्यानंतर उभं राहून त्याने गुकेश सोबत हात मिळवला. मात्र यावेळी गुकेश तोंडावर हात ठेवून आश्चर्यचकित होऊन हे पाहत होता. या विजयासह, डी गुकेश नॉर्वे बुद्धिबळ 2025 च्या गुणतालिकेत 8.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आणि आता तो कार्लसन आणि अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनापेक्षा फक्त एक गुण मागे आहे.