Spread the love

किल्ले रायगड / महान कार्य वृत्तसेवा

रायगड किल्ल्यावर भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण संयुक्तपणे उत्खनन सुरू केले आहे. या उत्खननात ‘यंत्रराज’ अर्थात सौम्ययंत्र हे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण सापडल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले.

खगोलशास्त्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते, याबाबतचा हा महत्त्वपूर्ण पुरावा आहे. हे उपकरण ग्रहताऱ्यांचा अभ्यास, दिशा शोधणे आणि वेळ मोजणे यासाठी वापरले जात असे. त्याच्या सहाय्याने अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त आणि विषुववृत्तांचा अभ्यास केला जायचा; असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

रायगड किल्ल्यावर मागील काही वर्षांपासून वेगवेगळ्या भागांमध्ये उत्खनन सुरू आहे. रोपवेच्या मागच्या बाजूस, कुशावर्त तलावाजवळ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर परिसरात उत्खनन सुरू आहे. हे काम सुरू असताना कुशावर्त तलावाच्या वरील बाजूस वाडेश्वर मंदिराच्या मधल्या भागात हे यंत्र आढळले.

यंत्रावर कोरलेल्या अक्षरांमध्ये ”मुख” आणि ”पूंछ” असे स्पष्ट उल्लेख आहेत, जे उत्तर-दक्षिण दिशांचा अंदाज लावण्यासाठी वापरले जात असावेत. तसेच मध्यभागी कोरलेले कासव आणि साप यावरुन ही वस्तू प्राचीन भारतीय शिल्प परंपरेचा भाग असण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

सापडलेल्या यंत्रामुळे रायगडाच्या इतिहासाशी संबंधित नवी माहिती मिळण्याची शक्यता वाढली आहे. भविष्यातील संशोधनासाठी हा एक अमूल्य ठेवा आहे.