Spread the love

‘लाडकी बहीण’च्या वक्तव्यावर अजित पवारांचाही समाचार

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्ते पाण्याने तुंबत आहेत. तुम्ही नाशिक दत्तक घेतले होते. पण तुम्ही नाशिकचे अनाथाश्रम केले आहे, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय. तर लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरही संजय राऊत यांनी टीका केलीय. 

संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. तर याच सोहळ्यासाठी संजय राऊत देखील नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे विवाह सोहळ्याच्या निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गटाचे एकत्र येणार आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, कोणी कुणाच्या लग्नाला येणार? हा काही राजकीय विषय नाही. मी उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. मी आज लग्नाला जाणार आहे. मंगलकार्य आहे इतकेच मी म्हणेन. विलास शिंदे यांनी कुणाला बोलवले हे मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दत्तक नाशिकचं अनाथाश्रम करून टाकलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्‌‍वभूमीवर बैठक घेतली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री नाशिकमध्ये येऊन कुंभमेळा बैठक घेतात. पण नाशिकची काय परिस्थिती झाली आहे ते बघा. शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्ते पाण्याने तुंबत आहेत. तुम्ही नाशिक दत्तक घेतले होते. पण तुम्ही नाशिकचे अनाथाश्रम केले आहे. कुंभसाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले जात आहेत. पण किती हजार कोटी रुपयांचे प्रत्यक्षात कामे होणार आहेत? सरकारी पैशांची कशा प्रकारे लूट होतेय, हे तुम्ही प्रयागराजमध्ये पाहिले आहे. प्रयागराजमध्ये सगळे टेंडर गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आले होते. नाशिकमध्ये सुद्धा काही वेगळे होईल, असं मला वाटत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.

अलीकडे फक्त लुटण्यासाठी पालकमंर्त्यांची नेमणूक

महायुतीत नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, काल मुख्यमंत्री बरोबर बोलले, पालकमंर्त्याची गरज काय? मंत्री कामच करत नाही, बाकीच्या ठिकाणचे पालकमंत्री काय दिवे लावत आहेत तुम्ही पाहा, अलीकडे फक्त लुटण्यासाठी पालकमंर्त्यांची नेमणूक होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय.

अजित पवारांनी राजीनामा द्यावा लाडकी बहीण योजनेत सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचे होते, अशी कबुली उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी दिली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या नावाने आर्थिक घोटाळा झाला आहे. अजित पवार यांनी याचे प्रायश्चित्त घेतले पाहिजे. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे. अनेक लाडक्या भावांनी स्वत:च्या नावात बदल करून करोडो रुपये लुटले आहेत. अर्थ खात्यातून हे पैसे गेले आहेत. त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा, असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.