Spread the love

पीपीई किट नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा नकार

कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कोल्हापूरमध्येही कोरोना बाधित महिलेचा बळी गेला आहे. 75 वर्षीय महिलेवर  चार दिवसांपासून सीपीआय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. रविवार 1 जून रोजी उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला पाचगाव येथील असून ती कोरोना बाधित होती.

दरम्यान, महिलेच्या मृत्यूनंतर पालिका कर्मचाऱ्यांनी पीपीई किट नसल्याने संबंधित महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ दोघेही कोल्हापूरचे आहेत. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांच्या जिल्ह्यात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, देशात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3783 वर पोहोचली आहे. 22 मे रोजी भारतात 157 रुग्ण होते. 9 दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये 1372 टक्के वाढ झाली आहे. अशी माहिती आरोग्य विभागाच्या आरोग्य वेबसाईटवर देण्यात आली आहे. केरळमध्ये सर्वाधिक 1400 रुग्ण आहेत. त्याच वेळी, महाराष्ट्रात 485 आणि दिल्लीत 436 सक्रिय रुग्ण आहेत. जानेवारीपासून कोरोनामुळे 29 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी गेल्या दोन दिवसांत २2 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी, बेंगळुरूमध्ये एका 63 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. त्याला दोन्ही लसींसह बूस्टर डोस देखील देण्यात आला होता. त्याच वेळी, दिल्लीत एका 60 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. महाराष्ट्र-केरळमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक रुग्ण दगावले आहेत.