Spread the love

पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेची महापालिकेकडे मागणी

इचलकरंजी : महान कार्य वृत्तसेवा (सागर बाणदार)

इचलकरंजी येथील मंगळवार पेठ परिसरातील कु.नंदिनी विजय वाईंगडे या विद्यार्थीनीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने ती १५ फूट बेसमेंटमध्ये कोसळून गंभीर झाली आहे.तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  तरी तिच्या उपचारासाठी महापालिका प्रशासनामार्फत वैद्यकीय खर्च देण्यात यावा. तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख सुनिलदत्त संगेवार यांच्याकडे देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी शहरातील वृत्तपत्र विक्रेते विजय वाईंगडे यांची मुलगी नंदिता वाईंगडे ही सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सायकलवरुन क्लासला निघाली होती.याच दरम्यान, मराठे काॅर्नर येथे अचानक कुञ्यांनी तिचा पाठलाग करत तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नंदिता हिने घाबरुन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जोरात सायकल मारण्याच्या प्रयत्नात ती एका मोठ्या इमारतीच्या १५ फूट खोल बेसमेंटमध्ये कोसळली. यामध्ये तिच्या हाता – पायाला ,डोक्याला ,चेह-याला आणि पाठीला गंभीर दुखापत. झाली आहे.तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती अधिकच गंभीर बनली आहे. त्यामुळे तिच्यावरील वैद्यकीय उपचारासाठी मोठा खर्च येणार आहे.तरी तिच्या वैद्यकीय उपचारासाठी महापालिका प्रशासनाने खर्च देण्याची व्यवस्था करावी. तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी सुनिलदत्त संगेवार यांना देण्यात आले.

यावेळी अधिकारी सुनिलदत्त संगेवार यांनी या मागणीबाबत वरिष्ठ पातळीवर तातडीने योग्य पाठपुरावा करु ,असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले. यावेळी पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शिवगोंडा खोत, सचिव अण्णासाहेब गुंडे, संचालक शिवानंद रावळ, अमोल मुसंडे, नारायण शिंदे, कृष्णा हजारे, महादेव चिखलकर यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.