Spread the love

गंगटोक / महान कार्य वृत्तसेवा

उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. त्यामुळे अनेक मुख्य रस्ते बंद झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीत उत्तर सिक्कीमच्या विविध भागात सुमारे 1500 पर्यटक अडकले आहेत. तीस्ता नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. मुसळधार पाऊस सुरुच राहिल्यानं बेपत्ता झालेल्या आठ पर्यटकांची शोध मोहीम सध्या थांबवण्यात आली आहे.

गुरुवारी रात्री मंगन जिल्ह्यात लाचेन-लाचुंग महामार्गावरील मुनसिथांगजवळ 1,000 फूटांपेक्षा जास्त खोल तीस्ता नदीत वाहन कोसळून एकाचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले तर 8 जण बेपत्ता झाले. नदीत बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली.

पर्यटकांना हॉटेलमध्ये थांबण्याचा सल्ला- मांगनचे एसपी सोनम देचू भुतिया म्हणाले, लाचेनमध्ये 115 पर्यटक आणि लाचुंगमध्ये 1350 पर्यटक अडकले आहेत. भूस्खलनामुळे रस्ते बंद असल्यानं पर्यटकांना त्यांच्या हॉटेलमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत होऊन परिस्थिती सुधारेल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळितअधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी जिल्ह्यात दिवसभर सतत पाऊस पडत होता. परिसरात ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तीस्ता नदीच्या पाण्याती पातळी वाढली. यापूर्वी शुक्रवारी दुपारी वीजपुरवठा खंडित झाला होता. तर रविवारपर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. सुमारे 24 तासांनंतर शनिवारी दुपारी 3 वाजता मोबाईल कनेक्टिव्हिटी पूर्ववत करण्यात आली. उत्तर सिक्कीममध्ये, थेंग आणि चुंगथांग भागात भूस्खलन झाल्याची नोंद आहे.

अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला-पर्यटन विभागाच्या बचाव मोहिमेतील आनंद गुरुंग म्हणाले, आम्ही बचाव मोहिमेसाठी निघालो होतो. गाडी नदीत पडून बेपत्ता झालेल्या पर्यटकांना शोधण्यासाठी आम्ही निघालो होतो. पुढील 7 ते 8 किमीपर्यंत रस्ते बंद आहेत. घटनास्थळी असलेली पथके बचाव कार्य करत आहेत. नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा, शक्य असेल तिथे घरात राहण्याचा हवामान विभागानं सल्ला दिला. नदीकाठ आणि संवेदनशील उतारांपासून दूर राहण्याचादेखील हवामान विभागानं नागरिकांना सल्ला दिला.