Spread the love

धुळे / महान कार्य वृत्तसेवा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्‌‍वभूमीवर उबाठा खासदार संजय राऊत हे धुळे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शासकीय गुलमोहर विश्रामगृह इथं आल्यानंतर 102 रुममधील रोकड प्रकरणी प्रशासनाला चांगलच धारेवर धरलं. ”आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्‌‍वभूमीवर आम्ही दौऱ्यावर आहोत. शासकीय गुलमोहर विश्रामगृह इथं आल्यानंतर मी पहिल्यांदा खोली क्रमांक 102 बद्दल विचारलं. कारण 102 नंबरची खोली सध्या भारतभर गाजत आहे. ‘102 नंबर के कमरे मे क्या हुआ, माल किसका था और आगे क्या हो गया’ हे मला दिल्लीतून विचारलं जात आहे. 102 नंबरच्या खोलीवर सिनेमा देखील काढावा लागेल,” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

अंदाज समितीच्या चेयरमनच्या पीएकडं आढळली रोख : ”राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी असणारे कामराज निकम यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस अधीक्षकांना मला विचारायचे आहे, ही तत्परता तुम्ही 102 खोलीच्या संदर्भात का दाखवली नाही. आज घाईघाईनं गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्याच्या अंदाज समितीच्या चेअरमनच्या अधिकृत पीएकडं दीड दोन कोटी रुपयांची कॅश सापडली. या खोलीमध्ये धुळ्यातल्या आसपासचे ठेकेदार दोन दिवसापासून पैसे गोळा करत होते. काही रक्कम बाहेर गेली तर दहा कोटी रुपये जालन्यामध्ये जमा करायचे होते,” असा आरोप त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना कारागृहात टाकलं : ”माझ्या प्रशासनात भष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाकेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र त्यांच्या गृहखात्यानं संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या या प्रकरणांमध्ये आत्तापर्यंत किती जणांना तुरुंगात टाकलं. एसआयटी स्थापन केली सांगतात, मात्र ती आहे कुठे ? पालकमंर्त्यांना आव्हान देणाऱ्या एका पदाधिकाऱ्यावरती खोटे गुन्हे दाखल करताना हे पोलीस अधीक्षक तत्परता दाखवतात हा सरळ सरळ या राज्यातला दहशतवाद आहे. खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही आमचं मनोबल खच्चीकरण करू शकत नाही,” असा आरोप करुन संजय राऊत यांनी पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

नजराणा देण्यासाठी कोट्यवधी रुपये गोळा केले : ”महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यातील भष्टाचारावर किती वेळा बोलायचं. आम्ही संघर्ष करत आहोत, आम्ही लढत आहोत म्हणून काही प्रकरणं समोर तरी येत आहेत. अंदाज समिती ही राज्यातील अत्यंत महत्त्वाची समिती आहे. मात्र त्यांच्या चेअरमनला नजराणा देण्यासाठी कोट्यवधी रुपये गोळा केले जातात. त्यांनी केलेले काळे कृत्य लपवण्यासाठी, हे चेअरमन महाशय एकनाथ शिंदे गटाचे आहेत. त्यांचा पूर्व इतिहास काय आहे, ते आमच्याकडं होते. त्यांच्यावर ईडीची कारवाई होऊ नये म्हणून ते तिकडं गेले. त्यांना अंदाज समितीचं अध्यक्ष करताना पूर्व इतिहास दिसला नाही का, मी भष्टाचार विधिमंडळात येऊ देणार नाही असं म्हणणाऱ्यांच्या खुर्ची खाली भष्टाचार सुरू आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला. भष्टाचार करून 40 आमदारांना अपात्र ठरवले : ”भष्टाचार करून 40 आमदारांना अपात्र ठरवलं. तुमच्याकडून आमच्या अपेक्षा नाहीत. धुळ्यात बाहेर आलेल्या या प्रकरणावर विरोधी पक्षातल्या सर्वच पक्षांनी बोललं पाहिजे. जर ते बोलणार नसतील तर त्यांनी सरकारमध्ये विलीन झाल्याचं स्पष्ट करावं,” असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी यावेळी केला.