सत्य बाहेर आलं पाहिजे, काँग्रेसची मागणी
सिंगापूर, नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
पाकिस्तानशी झालेल्या अलिकडच्या लष्करी चकमकीत विमानांचे नुकसान झाल्यानंतर भारताने रणनीती सुधारली आणि पाकिस्तानी हद्दीत आतपर्यंत हल्ला केला, असं संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी सांगितलं. सहा भारतीय विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा ”पूर्णपणे चुकीचा” असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत जनरल चौहान यांनी सांगितलं की, भारताने सर्व विमाने वापरली आणि सुरुवातीच्या नुकसानाची कारणे शोधून काढल्यानंतर पाकिस्तानवर प्रत्युत्तर देण्यासाठी अचूक हल्ले केले.
संरक्षण प्रमुखांनी संख्येच्या बाबतीत नुकसान स्पष्ट करण्यास नकार दिला. परंतु स्पष्टपणे सांगितलं की भारतीय सैन्याने पाकिस्तानी हद्दीत आतपर्यंत जाऊन हल्ला केला, ज्यामुळे पाकिस्तानला हे सगळं थांबवण्याची विनंती करण्यास भाग पाडलं. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या या टिप्पण्या म्हणजे शेजारील देशासोबतच्या चार दिवसांच्या लष्करी चकमकीत झालेल्या नुकसानाची भारतीय लष्कराची पहिली स्पष्ट कबुली आहे. ”मला वाटतं की जेट पाडणं महत्त्वाचे नाही तर ते का पाडलं जात आहे हे महत्त्वाचं आहे,” असं सध्या सिंगापूरच्या दौऱ्यावर असलेले जनरल चौहान म्हणाले.
जनरल चौहान यांना विचारण्यात आलं की, या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानशी झालेल्या चार दिवसांच्या लष्करी चकमकीत भारताने लढाऊ विमाने गमावली का. त्यावर ते म्हणाले, ”चांगली गोष्ट म्हणजे आम्ही केलेल्या रणनीतिक चुका समजून घेतल्या, त्या दुरुस्त केल्या, नंतर दोन दिवसांनी पुन्हा आमची सर्व विमाने पुन्हा लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी धाडली,”. ऑपरेशन सिंदूर दरम्यान सहा भारतीय विमाने पाडल्याच्या पाकिस्तानच्या दाव्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ”हे पूर्णपणे चुकीचे आहे.”
भारतीय हवाई दलाचे हवाई ऑपरेशन्सचे महासंचालक एअर मार्शल ए.के. भारती यांनी मान्य केलं होतं की, ”नुकसान हा लढाईचा एक भाग आहे” आणि सर्व भारतीय हवाई दलाचे वैमानिक ”सुरक्षितपणे घरी परतले” असं ते म्हणाले. 11 मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केलं. पाकिस्तानने भारतीय विमाने पाडल्याच्या दाव्यावरील प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं होतं.
जनरल चौहान यांच्या वक्तव्यानंतर काही तासांतच, काँग्रेसने सरकारला पाकिस्तानसोबतच्या चार दिवसांच्या संघर्षात कोणते नुकसान झाले हे खरे सांगण्याची मागणी केली. काँग्रेस नेते उत्तम कुमार रेड्डी म्हणाले की, देशाला जाणून घ्यायचे होते की संघर्षादरम्यान कोणतेही विमान पाडले गेले आहे का, विशेषत: सीडीएसच्या ”कबुली” नंतर.
सरकारकडून स्पष्टतेची मागणी करताना, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आठवण करून दिली की, वाजपेयी सरकारने जुलै 1999 मध्ये ”भारताचे धोरणात्मक व्यवहार तज्ज्ञ के सुबह्मण्यम, ज्यांचे पुत्र आता आपले परराष्ट्र मंत्री आहेत” यांच्या अध्यक्षतेखाली कारगिल पुनरावलोकन समिती स्थापन केली होती. कारगिल युद्ध संपल्यानंतर फक्त तीन दिवसांनी हे घडलं, असं ते म्हणाले. ”समितीने पाच महिन्यांनंतर त्यांचा सविस्तर अहवाल सादर केला. ”सिंगापूरमध्ये संरक्षण प्रमुखांनी नुकतेच जे उघड केले आहे त्यानुसार मोदी सरकार आता असेच पाऊल उचलेल का?” रमेश यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
