Spread the love

हातकणंगले / महान कार्य वृत्तसेवा 

हातकणंगले येथील सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांनी मुलगी ओवी हिच्या स्मरणात संकल्प केलेल्या माझी लेक लाखात एक या योजनेचा शुभारंभ रविवार 1 जून रोजी मान्यवरांच्या उपस्थित होत आहे. हातकणंगले शहरात जन्मलेल्या पाच मुलींची नावे तीन हजार रुपयाची ठेव ठेवून या योजनेचा शुभारंभ होत आहे. 

दरम्यान नगरपंचायतीने सागर पुजारी यांच्या या संकल्पनेचे स्वागत केले असून तसा प्रशासकीय सभेत ठराव करून अभिनंदन केलेले आहे. 

सागर पुजारी यांची कन्या ओवी हिचा असाध्य अशा विषाणूमुळे 25 मे रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. हे दुःख कुणाचेही वाटायला येऊ नये. आणि मुलीचे स्मरण कायम राहावे, या उदात हेतूने त्यांनी माझी लेख लाखात एक ही संकल्पना राबवण्याचा निर्धार केला आणि 31 मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ही योजना सुरू केली आहे. मागील चार दिवसात हातकणंगले सरकारी आणि खासगी इस्पितळात 5 मुलींनी जन्म घेतला आहे. त्यांना ओवीच्या नावाने ठेव पावती वितरण समारंभ 1 जून रोजी होणार आहे. पहिल्या टप्प्यात ही योजना हातकणंगले शहरापुरती मर्यादित असली तरी पुढील काळात संपूर्ण हातकणंगले तालुकाभर ही योजना राबवण्याचा संकल्प असल्याचे सागर पुजारी यांनी सांगितले.

मित्राच्या संकल्पनेला शुभेच्छा 

बाप लेकीचं काय नातं असतं हे मी जवळून पाहिले आहे. मुलगीचा जीव वाचण्यासाठी सागरने केलेला संघर्ष मी पाहिला आहे. देशात औषध उपलब्ध नाही, म्हणून चीन मधून मुलगीला वाचण्यासाठी औषध आणण्याचे धाडस एक बाप म्हणून सागर यांनी केले. मी याचा साक्षीदार आहे आणि एका मित्राने राबवली संकल्पना अतिशय चांगली आहे. याला माझ्या शुभेच्छा आहेत

  • दादासो गोरे