भुयारी मार्गात अपघात ग्रस्त व्यक्तीचा झाला मृत्यू
रुकडी / महान कार्य वृत्तसेवा
गावामध्ये प्रवेश करण्यासाठी दोन प्रमुख रस्ते आहेत. त्यापैकी अतिग्रे गावाच्या दिशेने रुकडी कडे येण्यासाठी प्रमुख मार्गामध्ये भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग विविध समस्याने मृत्यूचा सापळा बनला आहे.या रूकडीतील भुयारी मार्गाने मुडशिंगी (ता:हातकणंगले) येथील हिंदुराव ज्ञानू यादव (वय ६६) या शेतकऱ्याचा बळी घेतला.रुकडी येथे गुरुवारी आठवडा बाजार भरतो या बाजारात (दि.८ मे) रोजी मयत शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला विकण्यासाठी आले होते. सायंकाळी बाजार आटोपून आपल्या घरी जात असताना रेल्वे भुयारी मार्गात आल्यानंतर त्यांची गाडी घसरली व त्यांचे रस्त्यावर डोके आदळल्याने त्यांना गंभीर इजा झाली इचलरकंजी येथील खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार चालू होते त्यांनी २१ दिवस मृत्यूशी झुंज दिली पण ती व्यर्थ ठरली. (दि.३०) मे ला त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच ठिकाणी काही दिवसापूर्वी अतिग्रे गावातील एका ग्रामपंचायत सदस्याचा तुटलेल्या ग्रीलमध्ये गाडीचे चाक अडकून अपघात झाला होता त्यांना लाखो रुपयाचा फटका बसून कायम स्वरूपी अधू होण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी ग्रा.सदस्य शंकर मुरूमकर व सामाजिक कार्यकर्ते सुनील मारुती भारमल यांनी तुटलेल्या धोकादायक ग्रीलची दुरुस्ती केली होती.आणखीन एखादी दुर्दैवी घटना होण्याआधी रेल्वे प्रशासन व रुकडी ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच जागे व्हावे.याचे संयुक्तपणे देखभालीची संपूर्ण जबाबदारी घ्यावी. नागरिकांना होणारा नाहक त्रास कमी व्हावा. प्रवासासाठी बनलेला या मृत्यूच्या सापळ्यातून नागरिकांचे प्राण वाचवावेत.अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
भुयारी मार्ग मृत्यूचा सापळा बनण्याचे कारणे
या भुयारी मार्गात गटारीचे पाणी झिरपत असून शेवाळ तयार होवून नियमित छोटे-मोठे अपघात होत आहे. या भुयारी मार्गात झिरपणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे.त्या ठिकाणी दिवाबत्तीची सोय करणे आवश्यक आहे.दिशादर्शक सूचना फलकाची आवश्यकता,पद मार्ग नसल्याने शाळकरी मुलांना त्या मार्गातून जाताना रेल्वे रुळावरून धोकादायक प्रवास करावा लागतो. या समस्या दूर झाल्यानंतरच नागरिकांचा प्रवास सुखकर होईल.
