इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी महानगरपालिकेकडील स्वच्छ निवृत्ती घेतलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना महापालिका सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले आहे. अशा कर्मचाऱ्यांनी आपली सेवा प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठतेने बजावावी, असे आवाहन महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना केले. त्या स्वच्छ निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती पत्राचे वाटप कार्यक्रमांमध्ये बोलत .
इचलकरंजी महानगरपालिका आरोग्य विभागाकडील काही सफाई कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. या स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या २५ पात्र वारसांना आमदार डॉ.राहुल आवाडे यांच्या हस्ते नियुक्तपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
याचप्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून इचलकरंजी परिसरातील गरजु रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक असणारा निधी आमदार डॉ.राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मंजूर झाला आहे. त्या वैद्यकिय निधी मंजुरी पत्रांचे वाटपही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सहा. आयुक्त विजय राजापुरे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, माजी सभापती श्रीरंग खवरे, रवी जावळे, यांचेसह सेवानिवृत्त महानगरपालिका कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे लाभार्थी उपस्थित होते.
