प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
हिंदू समाजासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. ही आव्हाने परतवून लावण्याची ताकद दुर्गांमध्ये आहे. दुर्गांनी सक्षम होऊन समाजाला दिशा द्यावी, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी केले. विश्व हिंदू परिषद, दुर्गावाहिनीच्यावतीने राजर्षी शाहू महाराज पुतळा येथून महात्मा गांधी चौकापर्यंत भव्य शौर्य संचलनाचे आयोजन करण्यात आले. त्याच्या समारोपाच्यावेळी ते बोलत होते.
इचलकरंजीतील डिकेटीईच्या इंदुमती आवाडे विद्या संकुलात २४ मेपासून सात दिवसांचा शौर्य प्रशिक्षण वर्ग सुरू असून यात नियुद्ध, दंड, यस्टी, छुरिका, दांडपट्टा आदींवर विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. या वर्गाचाच एक भाग म्हणून या संचालनाचे आयोजन केले होते. २५० हून अधिक दुर्गांनी सहभाग नोंदवलेल्या या संचलनात अग्रभागी भगवा ध्वज आणि भारतमातेची वेशभूषा धारण केलेली दुर्गा लक्ष वेधून घेत होती. ठिकठिकाणी नियुद्ध, दंड, यस्टी, छुरिका, दांडपट्टा आदींचे प्रात्यक्षिके सादर करत शौर्य प्रदर्शन घडवले.
या संचलनानंतर महात्मा गांधी चौकात झालेल्या समारोप प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहकार्यवाह भगतराम छाबडा, दुर्गावाहिनी प्रांत सहसंयोजिका गायत्री देशपांडे-कुंभार, क्षेत्रीय संजय मुद्राळे, जिल्हा उपाध्यक्षा सुचित्रा कुलकर्णी, मातृशक्ती जिल्हा संयोजिका अरुणा माने आदींनी मनोगत व्यक्त केले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संरक्षणाची जबाबदारी सांभाळली. शौर्य संचलनाचे नागरिकांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
या संचलनासाठी वर्गाधिकारी ॲड. मृणालिनी पडवळ, मातृशक्ती सहसंयोजिका अर्चना रानडे, वर्ग पालक विजय देशपांडे, विभाग संघटक रामचंद्र जोशी, राजलक्ष्मी आमणे, रेवती हणमसागर, शिवजी व्यास, सुजित कांबळे, तमन्ना पांडे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. आभार सुजित कांबळे यांनी मानले.
