पुणे / महान कार्य वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे मन:शांतीसाठी विपश्यना केंद्रावर गेले असून, याबाबत आता जोरदार चर्चा सुरू आहेत. यावर राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, चांगली गोष्ट असून, त्यांनी चांगला पर्याय निवडला आहे. त्यांना आता मन:शांती मिळेल, असं यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्यात. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची आरती करीत प्लास्टिक बंदीसंदर्भातील जनजागृती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आलीय, यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय.
प्लास्टिकचा वापर करू नका : यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज पर्यावरण संवर्धनासाठी केंद्र सरकारने ज्या काही सूचना केल्या आहेत, त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने प्रदूषण कमी करण्यासाठी काम हाती घेण्यात आलं आहे. हा कार्यक्रम प्रत्येक राज्यात राबवला जात आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान यांनी पर्यावरणाला महत्त्व देण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे दगडूशेठ मंडळ या पर्यावरण उपक्रमामध्ये सहभागी झाला आहे. प्लास्टिकचा वापर करू नका, असं आवाहन आम्ही करीत असल्याचंही मुंडे म्हणाल्यात.
लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार काटकसर नाही : लाडकी बहीण योजनेत सरकार काटकसर करीत आहे, असं पंकजा मुंडे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, तुम्हाला जे दिसत आहे ते मला माहीत नाही, अशी कोणतीही काटकसर या योजनेत होत नाहीये. लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार काटकसर करत नाही. कोणीही अफवा पसरवू नये असं यावेळी मुंडे म्हणाल्यात. राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. याबाबत पंकजा मुंडे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, कोण काय म्हणतं याकडे मी लक्ष देत नाही आणि त्याच्यावर बोलत नाही. माझ्या 22 वर्षांच्या राजकारणात दुसऱ्याच्या वक्तव्यावर मी कधीच बोलत नसल्याचं यावेळी मुंडे म्हणाल्या.
वैष्णवीला न्याय मिळायला पाहिजे : वैष्णवी हगवणे प्रकरणाबाबत पंकजा मुंडे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, वैष्णवीला न्याय मिळायला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक पाऊल उचललं पाहिजे. याबाबतचे सर्व निर्णय मुख्यमंत्री घेतील. तिच्यावर जी वेळ आली आहे, ती कोणत्याही महिलेवर येऊ नये, तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं यावेळी मुंडे म्हणाल्यात. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत मुंडे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, एक महिला जेव्हा तक्रार करते, तेव्हा महिला आयोगाने दखल घेणे क्रमप्राप्त आहे, मग कुठलीही तक्रार असू देत महिला आयोगाने त्याची दखल घेतली पाहिजे आणि पोलिसांनी कारवाई करायला हवी. महिला आयोगाला सुनावणी घेण्याच्या सूचना आम्ही करू, असं यावेळी मुंडे म्हणाल्यात.
