Spread the love

बीड / महान कार्य वृत्तसेवा

आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी एका व्यापाऱ्यानं खासगी सावकारांकडून व्याजानं पैसे घेतले. त्याची सहा पटीनं फेड देखील केली. मात्र राक्षसी वृत्तीच्या सावकारांना आणखीन पैसे हवे होते. ”आणखी पैसे दे नाही तर तुला चटके देऊन मारू” अशी धमकी सावकारानं दिल्याचा दावा व्यापाऱ्यानं चिठ्ठीत केला. सावकारांचा वाढता जाच सहन न झाल्यानं व्यापाऱ्यानं थेट पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. संजय कांकरिया असं खासगी सावकारांच्या जाचामुळं बळी गेलेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे. व्यापाऱ्याच्या आत्महत्येमुळं बीड जिल्ह्यातील सावकारकी किती जुलमी ठरतेय हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

…तर चटके देऊन मारू : पाटोदा इथले व्यापारी संजय कांकरिया यांनी खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. संजय कांकरिया खासगी सावकारांच्या दहशतीसमोर हतबल झाले होते. आर्थिक विवंचनेतून त्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतलं. खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची सहा पट रक्कम देखील दिली. मात्र त्या खासगी सावकारांची नजर कांकरिया यांच्या जमिनीवर होती. यासह त्यांना आणखीन पैसै पाहिजे होते. त्यासाठी त्यांनी संजय कांकरिया यांच्याकडं तगादा लावला होता. ”पैसे दिले नाही तर चटके देऊन तुझ्यासह कुटुंबाला जीवंत मारू” अशी धमकी दिली. ही धमकी संजय कांकरिया यांना सहन झाली नाही. सावकारांचा वाढलेला जाच पाहून संजय कांकरिया यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना पत्र लिहून आत्महत्या केली. सावकारांविरोधात गुन्हा दाखल : संजय कांकरिया यांनी व्याजानं खासगी पैसे घेतले होते. कांकरिया यांनी या दोघांना पैसे परत केले, तरीही यांनी अधिकच्या पैशांसाठी तगादा लावला. चटके देऊन जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर संजय कांकरिया यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सावकार फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांचं एक पथक रवाना झालं आहे,” अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली.