Spread the love

रायगड / महान कार्य वृत्तसेवा

राज्यात खोल समुद्रातील मासेमारीवर 1 जूनपासून दोन महिन्यांची शासकीय बंदी लागू होणार आहे. ही बंदी 31 जुलैपर्यंत लागू राहणार असून, या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यविभागाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. ही बंदी दरवर्षीप्रमाणेच माशांच्या प्रजनन काळात त्यांचे संख्यावाढीचे प्रमाण अबाधित ठेवण्यासाठी लागू केली जाते. यामुळे मासे आणि इतर सागरी जीवांचे संवर्धन होण्यास मदत होते.

माशांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी बंदी : मत्स्य व्यवसाय कोकण किनारपट्टीवरील प्रमुख आर्थिक घटकांपैकी एक आहे. येथील मोठ्या समुद्रकिनाऱ्यामुळे मासेमारीचा व्यवसाय जोमात चालतो. मात्र, पावसाळ्यात समुद्रात निर्माण होणाऱ्या वादळामुळे मासेमारीस धोका संभवतो. तसेच या काळात अनेक प्रजाती प्रजनन अवस्थेत असतात. त्यामुळे माशांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी ही बंदी अत्यावश्यक मानली जाते. या बंदीमुळे बाजारात माशांचा पुरवठा कमी होण्याची शक्यता असून, परिणामी मासे खवय्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागण्याची शक्यता आहे. मासेमारी बंद असल्याने माशांचे दर वाढू शकतात, अशी माहिती मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील जाणकारांनी दिली. शासनाने या कालावधीत नियमांचे पालन होईल यासाठी कडक निरीक्षण ठेवण्याचे निर्देश दिले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कडक कारवाईचे संकेत : खोल समुद्रात अथवा किनारी भागात यांत्रिक अथवा यंत्र असलेल्या बोटीने मासेमारी करणे बंद असणार आहे. तर किनारी भागात बिना यांत्रिक बोटीमधून पारंपरिक मासेमारी करण्यास बंदी नसणार आहे. मात्र अनेक भागात शासणाचे आदेश धुडकावून यांत्रिक बोटीच्या माध्यमातून बेधडकपणे मासेमारी करण्यात येते. बंदी काळात अशा मासेमारी बोटींवर कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.