नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
’आधार नोंदणी आणि अद्यतन नियम, 2016’ नुसार, आधार नोंदणीच्या तारखेपासून दर 10 वर्षांनी ओळख आणि पत्त्याचा पुरावा अपडेट करणं अनिवार्य आहे. पण अनेकजण अद्याप नोंदणीपासून जुनेच आधार कार्ड वापरताना दिसतात. अशा लोकांना आधार कार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी 14 जून 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पण अंतिम मुदतीनंतर आधार कार्डवरील माहिती मोफत अपडेट करण्याची सेवा लोकांना मिळणार नाही, त्यांना माहिती अपडेट करण्यासाठी कार्डधारकांना प्रत्यक्ष आधार केंद्रावर जावं लागेल.
त्यामुळे जर तुम्हीही मागील 10 वर्षांत आधार कार्डाची माहिती अपडेट केली नसेल, तर हे काम 14 जूनपर्यंत पूर्ण करा. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने गेल्या वर्षी आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जून 2025 पर्यंत वाढवून दिली आहे. तुम्ही या तारखेपर्यंत आधारकार्डवरील आपली माहिती मोफत अपडेट करू शकतात. यानंतर तुम्हाला ही संधी मिळणार नाही.
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा फक्त वेबसाइटवर उपलब्ध आहे. जर तुम्ही आधार केंद्रात जाऊन हे काम केले तर तुम्हाला त्यासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल. myAadhaar या वेबसाईटवरुन आधारकार्डवरील माहिती मोफत कशी अपडेट करायची याची माहिती खाली दिली आहे. ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि प्रत्यक्ष केंद्रावर न जाता जलदगतीने अपडेट करता येते.
14 जून 2025 पूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट कसं करायचं:
सर्वप्रथम ब्राउजरमध्ये ”https://myaadhaar.uidai.gov.in” ही वेबसाइट ओपन करा.
निळ्या रंगाच्या ‘Login’ बटणावर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाका आणि OTP मिळवा.
लॉगिन केल्यानंतर तुमचा सध्याचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा योग्य आहे की नाही ते तपासा. जर अपडेट आवश्यक असेल, तर वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या ”Document Update” या पर्यायावर क्लिक करा.
ड्रॉप-डाउन लिस्टमधून तुम्हाला कोणती कागदपत्रं अपडेट करायची आहेत ते निवडा आणि संबंधित फाईल्स अपलोड करा. नंतर कागदपत्रं पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला सर्व्िहस रिक्वेस्ट नंबर मिळेल, ज्याद्वारे अपडेटची स्थिती ट्रॅक करु शकता.
