इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच मृत्यू झाला. राजेंद्र शिवाजी चोपडे (वय ५८, रा. तारदाळ रोड, खोतवाडी) असे त्यांचे नाव आहे. इचलकरंजी-सांगली मार्गावरील पाटील मळ्यात शनिवारी दुपारी झालेल्या या अपघातानंतर डंपर चालकाने पलायन केले. तर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करत तोडफोड केली. याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात दावलमलिक अल्लाबक्ष छपरबंद (वय ३१, रा.शामरावनगर, जयसिंगपूर, मुळ रा.येनकैंची-कर्नाटक) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
राजेंद्र चोपडे हे आज सकाळी कामानिमीत्त दुचाकी (क्र.एम.एच. ०९- डीएच ५२२०) ने इचलकरंजीत आले होते. काम झाल्यावर दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास ते इचलकरंजी-सांगली मार्गावरून घरी परत जात होते. दरम्यान ते पाटील मळा परिसरात आल्यावर हळुवार दुचाकी चालवत होते. यावेळी डंपर (क्र. एम.एच. २० एटी ८५९३) ने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीसह चोपडे रस्त्यावर पडल्यावर डंपर अंगावरुन गेल्याने चोपडे यांचा जागीच मृत्यू झाला. नागरीकांनी आरडाओरडा केल्याने डंपर चालकाने थोड्या अंतरावर जाऊन डंपर थांबवून पलायन केले. अपघाताची माहिती समजताच अपघातस्थळी नातेवाईक आणि मित्र मोठ्या संख्येने जमले होते.
यावेळी संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करुन तोडफोड केली. तर नागरीकांनीही गर्दी केली होती. या अपघाताची माहिती समजताच गावभागचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह पथक दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन विच्छेदनासाठी मृतदेह रुग्णवाहिकेतून आयजीएम रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात प्रविण राजेंद्र चोपडे (वय ३३, रा. खोतवाडी) याच्या फिर्यादीनुसार डंपर चालक दावलमलिक छपरबंद याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
