जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
खरीप हंगाम तोंडावर आल्याने राज्यामध्ये शेतकरी खते खरेदी करत असताना शेतक-यांना सर्रास लिंकींगची बोगस खताची सक्ती केली जात असून युरीया , पोटॅश , डी ए पी यासारखी खते किमतीपेक्षा जादा दराने विक्री केली जात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांनी फक्त वल्गना करून अधिका-यांच्या आड शेतक-यांची लुबाडणूक सुरू असल्याची टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली.
राज्यामध्ये खरीप हंगामाकरिता खताची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. केंद्र सरकारकडून अनुदान घेणा-या खत कंपन्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये खताची रेक आल्यानंतर जिल्ह्यातील होलसेल खत विक्रेत्याकडून त्या खतासोबत नॅनो युरीयासह सुक्ष्म अन्नद्रव्ये व इतर खताची लिंकींग केली जात आहे. ग्रामीण भागातील खत विक्रेत्याकडे खताच्या पोत्यावरील किंमतीपेक्षा जादा दराने खत विक्री होत आहे. विशेषकरून युरीया खताची किंमत २६५ रूपये असताना टंचाई दाखवून जवळपास ३०० ते ४०० रूपयांना विकले जात आहे.
कृषी विभागातील अधिकारी यांचे सदर लिंकीग व जादा दराने होत असलेल्या विक्रीवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. राज्य सरकारमधील मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांनी फक्त वल्गना केल्या आहेत. राज्याच्या गुण नियंत्रण विभागाचे या खत कंपन्यावर कोणतेच नियंत्रण राहिले नसून कृषी विभागातील अधिकारी सर्रास कृषी दुकानदार यांचेकडून हप्ते गोळा करत असून कृषी विभागातील अनेक अधिका-यांचे खत कंपन्यासोबत भागीदारी व आर्थिक हितसंबंध आहेत.सदर लिंकीग व जादा दराने होणारी खतविक्री थांबविण्यासाठी राज्य सरकारने थेट अनुदानित खताचे रेक आल्यानंतर सदरची अनुदानित खते थेट किरकोळ विक्रेत्यांना देवून खत पुरवठा करण्याबाबतचे धोरण अवलंबावे लागेल.
राज्यातील सर्व शेतक-यांनी कुठेही लिंकीग अथवा छापील किमतीपेक्षा जादा दराने खताची विक्री होत असेल तर संबधित जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांना संपर्क साधावे त्यांना खते उपलब्ध करून दिली जातील. मात्र लिंकींगने बोगस खताची खरेदी करू नये असे आवाहन राजू शेट्टी यांना केले आहे.
